कोल्हापूर : तब्बल आठवडाभरानंतर पावसाचे तुरळक सरींनी आगमन झाले आहे, पण सध्याची हवामानाची परिस्थिती पाहता दमदार पाऊस होणार नसल्याने या महिनाअखेरपर्यंत अशाच तुरळक सरींवर समाधान मानावे लागणार आहे. ऊन वाढणार असल्याने महापुराने बुडवले आणि उन्हाने वाळवले अशीच काहींशी पिकांची अवस्था होण्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्ह्यात सध्या असळका नक्षत्राचा पाऊस आहे. श्रावणसरीप्रमाणेच जिथे ढग उतरेल तिथे पाऊस पडत आहे. उन्हाचा तडाखाही वाढला आहे. गुरुवारी दुपारी अचानक पावसाच्या सरी कोसळल्या तरीही हवेत अजिबात गारवा नव्हता. जिल्हाभर कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती असून दिवसभरातून एखाद दुसरी हलकीशी सर येत आहे. यामुळे पिकांची हिरवाई कायम आहे, पण सध्या ऊन वाढू लागल्याने वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. विशेषत: भात आणि भुईमुगाला पाण्याची जास्त गरज आहे. भात पोटरीच्या, तर भुईमूग आऱ्या सुटण्याच्या, शेंगा पोसण्याच्या अवस्थेत आहे. यावेळेस पाण्याचा ताण बसला तर त्याचा फटका उत्पादनावर बसणार आहे. आधीच महापुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. महापुरातून जे काही वाचले आहे, ते आता या पावसाच्या दडीमुळे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून आठवडाभर तुरळक पाऊस असणार आहे, तर रविवार व सोमवारी पावसाचा जोर राहणार आहे. याचवेळी स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार आजपासून पावसाची दडी कायम राहणार असून केवळ १५ ऑगस्टला किरकोळ पाऊस पडेल. त्यानंतर पुन्हा २४ ऑगस्टलाच पाऊस होणार आहे. मधल्या काळात उन्हाच्या झळा तीव्र होणार आहेत.
चौकट
सोमवारपासून सासूचा पाऊस
सोमवारी मघा नक्षत्र अर्थात सासूचा पाऊस सुरू होत आहे. वाहन गाढव असले तरी पारंपरिक अंदाजानुसार पर्जन्यमान कमीच राहणार आहे. त्यामुळे मघा, ढगाकडे बघा या पारंपरिक म्हणीची प्रचिती येण्याची चिन्हे आहेत.
चौकट
दिवसभरात अवघा ३ मि.मी. पाऊस
गुरुवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात सरासरी अवघा तीन मि.मी. पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक ४. ९ मि.मीे. पाऊस आजरा तालुक्यात झाला आहे. चंदगडमध्ये ४.१, शाहूवाडीत ३.५, भुदरगडला ३.३, गगनबावड्यात २.८, तर उर्वरित तालुक्यात १ ते २ मि.मी. पाऊस गेल्या चोवीस तासात नोंदवला गेला आहे.