लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर गेल्या ३४ वर्षांत ‘गाेकुळ’च्या माध्यमातून जिल्ह्यातील लाखो शेतकरी आणि दूध उत्पादकांची सेवा करू शकलो याचे समाधान आहे, असे मनोगत माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी ‘गाेकुळ’च्या नव्या अध्यक्षांची निवड होत आहे या पार्श्वभूमीवर आधीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, १९८७ पासून एप्रिल २०२१ पर्यंत सलग ३४ वर्षे ‘गोकुळ’ संचालक म्हणून काम करण्याची संधी दूध उत्पादकांनी दिली. या कारकीर्दीमध्ये दोन वेळा या संघाचा अध्यक्ष म्हणून काम करता आले. २०१० पासून पुढे पाच वर्षे महानंद संचालक म्हणून आणि त्यातही एक वर्ष महानंद उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
आजऱ्यासारख्या जिल्ह्याच्या एका टोकाला असणाऱ्या छाेट्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना दूध संस्थांची उभारणी, त्यांचा विकास यासाठी सातत्याने कार्यरत राहिलो. उत्तूर, ता. आजरा येथे गायींचा गोठा उभा केला. शिक्षण आणि प्रत्यक्ष काम याची दखल घेत संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांनी पहिल्यांदा ‘गोकुळ’ वर संधी दिली.
माजी आ. महादेवराव महाडिक आणि आ. पी. एन. पाटील यांनी मोठा विश्वास दाखवला. त्याला मी कधी तडा जाऊ दिला नाही. जिल्ह्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रासह विविध उपक्रमांना सहकार्य करण्याची संधी मिळाली.
आजारपणामुळे माझ्या फिरण्यावर मर्यादा आल्या. त्यामुळे पंचवार्षिक निवडणुकीवेळीही मी फार कोणाशी संपर्क साधू शकलो नाही. माझ्यासह सर्वच सहकाऱ्यांच्या पाठबळावर ‘गाेकुळ’ केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अग्रगण्य बनवण्यामध्ये मी खारीचा वाटा उचलू शकलो याचे मोठे समाधान आहे.