कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधी आघाडीतून निवडून आलेल्या चारपैकी तीन संचालक राजकारण विरहीत, संघाचे हित पाहून कामकाजात सक्रिय सहभागी आहेत. ते ‘गोकुळ’च्या कामकाजाबाबत समाधानी आहेत, मग एकट्या शौमिका महाडिक यांचीच तक्रार कशी? अशी विचारणा करत वैयक्तिक राजकीय हेतूने प्रेरीत होऊन संघाची बदनामी न करता संघाच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी पत्रकातून केले.डोंगळे म्हणाले, संघात कोणताही गैरकारभार झालेला नाही, दूध उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानूनच कामकाज सुरू आहे. शौमिका महाडिक यांनी हेतूपुरस्सर चाचणी लेखापरीक्षणाची मागणी केल्यानेच आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली पण कारभाराचे अवलोकन करूनच लेखापरीक्षकांनी ‘अ’ वर्ग दिला. शेतकरी व ‘गोकुळ’चा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून सत्ताधारी आघाडीचे नेते व संचालक कार्यरत आहेत. महाडिक यांच्या चांगल्या सूचनांचे आम्ही स्वागतच करतो. कमीत कमी दरानेच ठेकासंघ कार्यक्षेत्रातील कुस्ती व इतर खेळांसाठी सामाजिक बांधीलकीच्या भावनेने प्रचलित पद्धतीनुसार देणगी दिलेली आहे. वेगवेगळी सीलबंद टेंडर्स संचालक मंडळाच्या सभेत उघडली जातात, त्यावर त्यांच्या सह्या असतात आणि कमीत कमी दरानेच ठेका दिला जातो, असे अध्यक्ष डोंगळे यांनी म्हटले आहे.‘लम्पी’ला आवर घालण्यात ‘गोकुळ’च पुढे‘लम्पी आजार प्रतिबंधित उपाययोजना आखण्यात गोकुळ दूध संघाने कुठेही हलगर्जीपणा केला नाही. लसीकरणासह उपचारात कुठेही कमी पडलेलो नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उपाययोजनेसह शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली. ‘लम्पी’ला आवर घालण्यात ‘गोकुळ’चे पुढे असल्याचे डोंगळे यांनी म्हटले आहे.
हिताची भूमिका घ्यासंघाच्या तालुकानिहाय संपर्क सभेचे निमंत्रण सर्व संचालकासोबत शौमिका महाडिक यांनाही दिले होते; परंतु त्या एकाही संपर्क सभेला हजर न राहता वैयक्तिक दौरा काढणार असल्याचे समजते. विरोधाचा दृष्टिकोन बाजूला ठेवून संघ हिताची भूमिका घ्यावी असा सल्लाही डोंगळे यांनी दिला.