सतीश जारकीहोळींना महाराष्ट्रात पाउल टाकू देणार नाही, भाजपचा इशारा; कोल्हापुरात केली निदर्शने
By संदीप आडनाईक | Published: November 11, 2022 05:46 PM2022-11-11T17:46:49+5:302022-11-11T17:47:51+5:30
कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दावरुन केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर आंदोलन
कोल्हापूर : कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील निपाणी भागात झालेल्या कार्यक्रमात कर्नाटककाँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दाचा अर्थही अत्यंत गलिच्छ असल्याचे म्हटले होते. यानंतर मोठा वाद निर्माण झाला. जारकीहोळी यांना महाराष्ट्रात पाउल टाकू देणार नाही असा इशारा आक्रमक झालेल्या भाजपने कोल्हापुरात दिला. जारकीहोळी यांच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहेत. आज, शुक्रवारी बिंदू चौकात भाजपच्या कोल्हापूर शाखेने निदर्शने करत त्यांचा निषेध केला.
जारकीहोळी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने काँग्रेसवर टीका केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी कर्नाटक काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदूंना चिथावणी दिली आहे आणि त्यांचा अपमान केला आहे. हा योगायोग नाही. हे व्होटबँकसाठी आहे, असा आरोप केला. जारकीहोळी नेहमी हिंदूविरोधी बोलणे आणि विशिष्ट धर्माचे तुष्टीकरण करतात. त्यांनी केवळ हिंदूंचाच अपमान केला नाही, तर युगप्रवर्तक छत्रपती संभाजी महाराजांदेखील अपमान केला आहे. भाजप जारकीहोळी यांना महाराष्ट्रातून कर्नाटकात जाउ देणार नाही, याचा जाब विचारेल असे चिकोडे म्हणाले.
निदर्शनात महेश जाधव, अशोक देसाई, नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे, हेमंत आराध्ये, दिलीप मैत्राणी, अमोल पालोजी, सचिन तोडकर, संतोष भिवटे, माणिक पाटील चुयेकर, विवेक कुलकर्णी, गायत्री राऊत, ओंकार खराडे, सुजाता पाटील आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.