कोल्हापूर : कोल्हापूर विधानपरिषद मतदारसंघातील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी तिरूपती-बालाजीचे दर्शन घेऊन विजयाचे साकडे घातले. जिल्ह्यात सध्या काँग्रेसला चांगले वातावरण तयार झाल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.पाटील रविवारपासून तिरूपतीमध्ये आहेत. आज, सोमवारी दुपारी ते तिरूपतीहून मुंबईला रवाना झाले. ते म्हणाले, ‘प्रतिवर्षी मी बालाजींच्या दर्शनासाठी डिसेंबरमध्ये तिरूपतीला जातो; परंतु यावेळी त्यादरम्यान निवडणूक असल्याने रविवारी गेलो होतो. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसला चांगले वातावरण तयार झाले आहे. त्यामुळेच महापालिका निवडणूक भाजपला सोबत घेऊन लढलेले आमदार महादेवराव महाडिक हे देखील काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. माझे पी. एन. पाटील व प्रकाश आवाडे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी मला ‘शब्द’ दिला आहे, काँग्रेसशी उमेदवारी कुणाला मिळेल त्याच्याशी ते प्रामाणिक राहणार आहेत. सोमवारी त्यांनी प्रदेशाध्यक्षांना दिलेल्या निवेदनात ‘मला उमेदवारी देऊ नये,’ असा उल्लेख नाही. कोल्हापुरात सध्या काँग्रेसला मिळत असलेले पाठबळ पाहता काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास आम्हा तिघांनाही आहे.’ (प्रतिनिधी)
सतेज पाटील यांनी घातले बालाजीला साकडे
By admin | Published: December 01, 2015 12:54 AM