लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भारताचे पाचवे हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या ‘लाल माती’ या आत्मचरित्राचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि. २७) सायंकाळी ५ वाजता येथील दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक व आमदार विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होत आहे. ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्करही या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
‘लोकमत’मध्ये मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी २०१८ मध्ये वर्षभर या आत्मचरित्राचे लेखन केले. त्याचे मुंबईच्या ग्रंथाली प्रकाशनाने पुस्तक केले आहे. उत्तर प्रदेशातील कुत्तुपूर गावातील लहाणपणीच वडिलांचे छत्र हरवलेला मुलगा ते कुस्तीतील सर्वोच्च हिंदकेसरी सन्मान पटकावणारा मल्ल असा त्यांच्या जीवनाचा प्रेरणादायी प्रवास आहे. लोकमत कोल्हापूर, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले आहे. कोल्हापूरच्या रांगड्या माणसाला कायमच लाल मातीची ओढ आहे. ती जोपासण्यासाठीच या सोहळ्यास अगत्यपूर्वक उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, ग्रंथालीचे सुदेश हिंग्लासपूर व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केले आहे.
हिंदकेसरीचा सुवर्णमहोत्सव...
दीनानाथ सिंह यांनी २८ मार्च १९७१ला नागपूरला झालेल्या लढतीत बिहारचा मल्ल लालबहाद्दर सिंग याला ढाक डावावर अस्मान दाखवून हिंदकेसरीचा किताब पटकावला. यंदा २८ मार्चला म्हणजे रविवारी या घटनेला ५० वर्षे होत आहेत. त्याचवेळी त्यांचे हे आत्मचरित्र लोकांच्या भेटीस येत आहे.
फोटो : २४०३२०२१-कोल-लाल माती