कोल्हापूर / दुर्वा दळवी
कोल्हापूरची अंबाबाई, झणझणीत मिसळ, रंकाळा, पन्हाळा हे समद जगाला ठाव हाय.. पण फुटबॉल म्हंजे कोल्हापुरच्या पेठा पेठातल्या लोकास्नी खुळ करणारा खेळ हाय.. आता तुम्ही म्हणाल आता अस काय झालं ह्या फुटबॉल पायी.. अवो काय झालं काय म्हणता.. त्यो यावर्षीचा 'फिफा वर्ल्डकप' हाय त्या कतार मंदी पण जणू काय कोल्हापुरातच ह्यो वर्ल्डकप होणार हाय अस मंडळाच्या पोरांनी जोरदार नियोजन केलया...
त्यामुळच एका कोल्हापुरी गड्यान आपल्या पोरग्याच्या पाचवीलाच थेट फुटबॉलच पुजला.. काय म्हणणार ह्यास्नी आता तुम्ही... आवो काय बी म्हणू शकत नाही तुम्ही कारण त्यांनी जे केलया तेच घडत बघा इथ.. पोरग रांगु लागल की पार म्हातारं हुइस्तोवर त्याला फुटबॉलचाच नाद लागतुया...
संध्यामठ तरुण मंडळाचा कार्यकर्ता अजय जगदाळे यास्नी 14 नोव्हेंबरला दुसऱ्यांदा पुत्ररत्न प्राप्त झालं. बाबाच्या अंगात कोल्हापुरी फुटबॉलचा नाद त्यामुळे पोरग्याच्या पाचवीला पण थेट त्यांनी फुटबॉल सकट फुटबॉल टीमच्या जर्सी पुजल्या. लहान लेकरांना संस्कार हे फुटबॉलचेच व्हावे म्हणून ह्यो सगळा खटाटोप केला ह्या भाऊंनी..
आता तुम्ही म्हणाल येवढं वेड ते पण एका खेळा. होय मंडळी कोल्हापुरात वर्षाचे आठ महिने फुटबॉल हंगाम अस्तुया त्यामूळ भागात सद्या ह्ये मोठ मोठे फ्लेक्स, कट आऊट, फ्लॅग, जर्सी आणि नुसता धुमाकूळ सुरू हाय.. ही सगळी नुसती तयारी हाय मंडळी खरा नजारा तर आता मॅचच्या वेळी दिसणार हाय कारण इथ प्रत्येक गल्ली गल्लीत शेमड्या पोरापासून घरातली समदी मोठ्या स्क्रीनवर मॅच बघणार हाईत.. तर अस हाय हे कोल्हापूर रांगड हायच पण अख्ख्या जगात आपल्या कामान नाव कमावणार.