कोल्हापूर : ‘उत्तर’च्या २०२२ साली झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार सत्यजित ऊर्फ नाना कदम हे आज शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपला हा मोठा धक्का असून विधानसभा उमेदवारीच्या राजकारणातूनच कदम यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. आपल्या सर्व समर्थकांना संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या महायुतीच्या सभेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहनही कदम यांनी केले आहे. काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे काँग्रेसला धक्का बसला होता, तर आता कदम यांच्या प्रवेशाने भाजपला धक्का बसणार आहे.कदम हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे आहेत. ते २०१० ते २०२० या कालावधीत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महापालिकेत त्यांना मानणारे काही नगरसेवक असून याच बळावर त्यांनी २०१४ साली कॉंग्रेसकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढवली आणि त्यांना ४७ हजार ३१५ मते मिळाली. भाजपच्या उमेदवारापेक्षा त्यांना ७ हजाराहून अधिक मते होती. अशातच २०१४ साली भाजप-शिवसेना सत्तेवर आल्यानंतर भाजप आणि महाडिक यांच्या ताराराणीच्यावतीने ३० हून अधिक नगरसेवक निवडून आले. त्यांचे नेतृत्व कदम करत होते. त्यातूनच २०२२ साली झालेल्या ‘उत्तर’च्या पोटनिवडणुकीत भाजपकडून उमेदवारी देण्यात आली; परंतु ७८ हजार मते मिळूनही कदम यांना पराभव स्वीकारावा लागला. आताही ते इच्छुक होते; परंतु खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे चिरंजीव कृष्णराज यांचे नाव पुढे आणल्याने ते नाराज होते. यातूनच त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची २७ ऑक्टोबरला भेट घेतली आणि याठिकाणी राजेश क्षीरसागर आणि कदम यांच्याशी चर्चा करून त्यांना विधान परिषदेवर किंवा राज्य नियोजन मंडळ कार्याध्यक्षपदाचा शब्द देण्यात आला. त्यावेळच्या चर्चेनुसार कदम आज काही मोजक्या सहकाऱ्यांसह शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.
कोल्हापुरात भाजपला धक्का, सत्यजित कदम शिंदेसेनेत प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 12:20 PM