कोल्हापूर : स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर आवाहन करूनही माजी आमदार मालोजीराजे यांनी त्यास प्रतिसाद दिला नसल्याने ते ‘कोल्हापूर उत्तर’ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या मतदारसंघातून सध्या तरी काँग्रेसपुढे सत्यजित कदम हाच सक्षम पर्याय असल्याचे चित्र दिसते. सागर चव्हाण यांचेही उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे.मंगळवारी कोल्हापुरात झालेल्या काँग्रेसच्या वचनपूर्ती मेळाव्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी मालोजीराजे यांना रिंगणात उतरा, असे जाहीर आवाहन केले. त्यामागे त्यांचा तुम्हाला हवी असते तेव्हा पक्षाने उमेदवारी द्यायची व पक्ष अडचणीत असताना तुम्ही माघार घ्यायची, हे बरोबर नाही, असेच सुचविण्याचा प्रयत्न होता. त्यास पालकमंत्री व स्वत: मुख्यमंत्री यांनीही पाठिंबा दिला व पक्षाची गरज म्हणून तुम्ही निवडणुकीस तयार राहा, अशा सूचना दिल्या. हे सगळे मालोजीराजे व्यासपीठावर बसून शांतपणे व हसतमुख चेहऱ्याने पाहत होते; परंतु त्यांनी बराच संयम पाळला. शेवटपर्यंत काय त्यांनी बसलेली जागा सोडली नाही. मेळाव्यात त्यांच्या उमेदवारीचा विषयच चर्चेचा ठरला.मुख्यमंत्र्यांच्या आवाहनास तुमचा काय प्रतिसाद असेल, अशी विचारणा करण्यासाठी त्यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला. त्यांचा संपर्क होवू न शकल्याने त्यांची भूमिका समजू शकली नाही. त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालोजीराजे कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणार नसल्याचे समजते. त्यामुळे मालोजीराजे नसतील तर मग काँग्रेसचा उमेदवार कोण, हा प्रश्न मतदारसंघातही विचारला जात आहे. या मतदारसंघातून सत्यजित कदम व सागर चव्हाण यांनी उमेदवारी मागितली आहे. कदम हे गेली दोन वर्षे विधानसभा डोळ््यासमोर ठेवून कार्यरत आहेत. माजी महापौर सागर चव्हाण यांचे नाव अचानक पुढे आले आहे. त्यामागेही राजकारण आहे. ‘उत्तर’चा उमेदवार कोण, हे ठरविण्यात कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आमदार महादेवराव महाडिक यांची भूमिका काय असेल, हादेखील एक महत्त्वाचा निकष असेल. आमदार महाडिक गट गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना छुपा विरोध करण्याची शक्यता आहे. सत्यजित कदम हे महाडिक यांचे भाचे आहेत म्हणून चव्हाण यांचे नाव स्पर्धेत आले आहे. मालोजीराजे यांना मागच्या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसअंतर्गत चांगले सहकार्य मिळाले नव्हते. याचाही फटका त्यांना गत निवडणुकीत बसला होता.
सत्यजित कदम यांचे नाव काँग्रेसकडून पुढे
By admin | Published: August 29, 2014 12:17 AM