सावरवाडी : कसबा बीड (ता. करवीर) येथील लोकनियुक्त सरपंच सत्यजित सुरेशराव पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीवेळी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार हा राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण सत्यजित पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिले.
कसबा बीड ग्रामपंचायतीसाठी २०१७ साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मार्केट कमिटीचे माजी उपसभापती शामराव सूर्यवंशी, करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, गोकुळचे संचालक सत्यजित पाटील व किसान सभेचे राज्य सरचिटणीस नामदेवराव गावडे यांच्या स्थानिक आघाडीने यश संपादन करून ११ जागांपैकी १० जागा जिंकल्या होत्या. तसेच सर्वसाधारण गटासाठी असलेल्या लोकनियुक्त सरपंचपदी गोकुळचे संचालक सत्यजित पाटील विजयी झाले होते.
दरम्यान, ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार सत्यजित पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा करवीरचे सभापती यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे निवड तारीख कळताच नूतन सरपंच म्हणून दोन्ही गटाच्या समन्वयातून एका सदस्याची निवड केली जाणार आहे.