कोल्हापूर: गोकुळ दूध संघाची यावर्षीची निवडणुक रंगत आहे. सत्ताधारी व विरोधी आघाडीही तुल्यबळ असल्यामुळे यावेळची निवडणुक सोपी राहिलेली नसल्यामुळे प्रत्येक नेत्यांनी पत्ते बाहेर काढले आहेत. आज सरुडमध्ये पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक यांनी सत्यजित पाटील यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा सत्ताधारी आघाडीसोबत घेतले.
राजकारणाची नवी समीकरणं जिल्ह्यासमोर येत आहेत. निवडणुकीची प्रक्रिया जशी सुरू होईल, तशी निवडणुकीमधील रंगत वाढत आहे. सत्यजित पाटील सरुडकर यांनी विरोधी राजर्षि शाहू आघाडीस पाठिंबा दिला होता, पण आमदार विनय कोरे यांनीही याच आघाडीला पाठिंबा दिल्याने सरुडकर गटातून प्रतिक्रिया उमटली.
कोरे गटाकडून पन्हाळ्यातून अमर पाटील तर काँग्रेसकडून शाहूवाडीतून कर्णसिंह गायकवाड यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही उमेदवार विधानसभेला कोरे यांच्यासोबत राहतात. त्यामुळे गोकुळची ताकद मिळाल्यास आपल्या अडचणी वाढतील असे सरुडकर गटाला वाटत होते. त्यावरून त्यांच्यात धुसफूस सुरु होती.
या आघाडीत राहायचे की नाही याचा फेरविचार करावा असा दबाव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सत्यजित पाटील यांच्यावर होता. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी स्वतः पत्रक काढून स्पष्टीकरण देखील दिले होते. पण आज सत्यजित पाटील यांच्यासह जि.प.बांधकाम व आरोग्य सभापती हंबीरराव पाटील यांनी आमदार पी.एन.पाटील आणि महादेवराव महाडिक यांची भेट घेऊन सत्ताधारी आघाडीसोबत राहत असल्याचा विश्वास दिला.सत्यजित पाटील यांच्याकडे शाहुवाडी, पन्हाळा तालुक्यातील बरेचसे ठराव आहेत, त्यामुळे शाहू आघाडीला निवडणूकीअगोदरच मोठा झटका बसला आहे.