गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना डॉ. जयसिंगराव पवार यांचे नाव माहीत आहे, त्याचे कारण त्यांची इतिहास विषयाची पुस्तके, पदवी, पदव्युत्तर आणि एमपीएससी, युपीएससी या परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी डॉ. जयसिंगराव पवार यांचीच पुस्तके वापरतात. सुबोध शैलीत लिहिलेली ही सर्व पुस्तके विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. तीस वर्षांच्या माझ्या अध्यापनाच्या अनुभवातून मला ही गोष्ट माहीत झाली की, डॉ. जयसिंगराव पवार हे विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय इतिहास लेखक आहेत. ‘मराठ्यांचा इतिहास’ हा त्यांच्या अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. मराठ्यांचा इतिहासाचा सांगोपांग अभ्यास असणारे आज अगदी बोटावर मोजता येतील इतकेच संशोधक आहेत. त्यामध्ये डॉ. जयसिंगराव पवार यांचे स्थान वरच्या दर्जाचे आहे. अलीकडच्या काळात डॉ. जयसिंगराव पवार महाराष्ट्रभर आणि संपूर्ण देशात तसेच जगभरातील अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध झाले. १९८० पासून मी डॉ. जयसिंगराव पवार यांच्या सान्निध्यात आहे. छत्रपती संभाजी महाराज, छ. राजाराम, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई, मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध या विषयांवर साधने मिळविताना जयसिंगराव पवार यांना अनेक नवीन साधने मिळाली. त्याबद्दल ते आमच्याशी चर्चा करीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सामान्यांसाठी स्वतंत्र असे शिवचरित्र लिहिण्याची फार मोठी गरज आहे, याची त्यांना जाणीव झाली होती, परंतु हाती घेतलेले अनेक प्रकल्प पूर्ण करण्याच्या प्राधान्यामुळे त्यांच्याकडून ही गोष्ट राहून गेली. कॉ. गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता’ ही पुस्तिका लिहिली. तेव्हाही डॉ. पवार व पानसरे यांची अनेक गोष्टींवर चर्चा होत असे. त्यांना मिळालेल्या नवीन साधनांच्या आधारे त्यांनी दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, ते शहाजी महाराजांचे प्रामाणिक कारभारी होते. तसेच ते आदिलशहाचे नोकर असल्यामुळे शिवाजी महाराजांचे सुरुवातीच्या काळातील किल्ले जिंकून स्वराज्य निर्मितीचे प्रयत्न दादोजींना मान्य नव्हते, ही गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध केली. शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची सर्व व्यवस्था त्यांचे वडील शहाजीराजे यांनी अत्यंत विचारपूर्वक केली होती. बंगलोरवरून येताना शिवाजी महाराजांच्या शिक्षणासाठी त्यांच्याबरोबर निरनिराळ्या विद्यांमध्ये पारंगत ३६ शिक्षकांना पाठविले होते. म्हणजेच दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीचे प्रेरणा देणारे नसून, त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब, पिता शहाजीराजे हेच त्यांचे खरे मार्गदर्शक आहेत, असा शोधनिबंध लिहून सिद्ध केले. नवीन वस्तुनिष्ठ साधने मिळाली तर इतिहासकाराने ती मान्य करून आपले जुने प्रतिपादन बदलले पाहिजे, हे जयसिंगराव पवार यांनी आम्हाला शिकविले आहे. सन १९६४ ते आजअखेर डॉ. जयसिंगराव यांनी जाणीवपूर्वक मानाची पदे नाकारून फक्त इतिहासाची सेवा केली आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे ते कृतिशील पाईक बनले आहेत. घरातील कोणत्याही धार्मिक कार्यासाठी पुरोहितास बोलावत नाहीत. सत्यनारायण, तुळशीचे लग्न, कर्मकांड, व्रतवैकल्ये बंद केली आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी मला साक्ष ठेवून त्यांची कन्या डॉ. मंजुश्री यांना तिला पसंत पडेल अशा कोणत्याही जातीच्या वा धर्माच्या मुलाशी लग्न करण्यास माझी परवानगी आहे असे सांगितले. ते मला म्हणाले की, मोठ्या माणसांची फक्त चरित्रे लिहून उपयोग नाही, तर त्यांचे विचार स्वीकारून कृती केली पाहिजे. आज जयसिंगराव सत्यशोधक विचार घेऊन कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी वसुधा त्यांच्या सर्व कार्यात बरोबरीने काम करतात. डॉ. अरुंधती, डॉ. मंजुश्री या त्यांच्या लेखनकार्यास सहकार्य करतात, शिवाय प्रबोधनाच्या कार्यात पुढे राहतात. अनेक प्रतिष्ठित असे २१ पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते डॉ. पवार यांचा सन्मान झाला आहे. ’ प्रा. डॉ. टी. एस. पाटील
सत्यशोधक --डॉ. जयसिंगराव पवार
By admin | Published: January 28, 2017 1:02 AM