हुपरी : येथील श्री व्यंकटेश एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी सौरभ सुनील कल्याणी याची भारतीय नौदलामध्ये सब लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. इंडियन नेबल अकॅडमी इजिमाला-केरळ येथे झालेल्या दीक्षांत समारंभात त्याला एअरचीफ मार्शल अरुण शहा यांच्या हस्ते न्यू दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची ‘बी. टेक. इन. अॅपलाईड, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ ही पदवी व सब लेफ्टनंट पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. दरम्यान, सौरभ हा दोन महिन्यांच्या पुढील प्रशिक्षणासाठी इजिप्त, इटली, स्पेन व इंग्लंड या चार देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. भारतीय संरक्षण दलात अधिकारी होणारा सौरभ हा परिसरातील पहिला विद्यार्थी ठरला आहे.सौरभचे येथील श्री व्यंकटेश एज्युकेशन सोसायटीच्या बालमंदिर व प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शिक्षण झाले असून, ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण सातारा सैनिक स्कूल येथे झाले. सैनिक स्कूलमध्ये असताना त्याने अनेक स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करीत १४ मेडल प्राप्त केली आहेत. त्यानंतर त्याने इंडियन नेवल अकॅडमी इजिमाला-केरळ येथे चार वर्षांचे नौदलाचे प्रशिक्षण पूर्ण केले. यादरम्यान त्याने पोहणे, हॉकी, फुटबॉल, रिले अशा खेळ प्रकारात विशेष प्रावीण्य दाखविले आहे. नौदल दिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या आॅल इंडिया सी. स्वीमिंग कॉम्पिटिशन या ६ किलोमीटर समुद्रात पोहण्याच्या स्पर्धेत अकॅडमीचे सलग ३ वर्षे प्रतिनिधित्व केले आहे.त्याला मांगोलीचे पी. जी. पाटील, अजित पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. (वार्ताहर)
सौरभ कल्याणी बनला सब लेफ्टनंट
By admin | Published: June 06, 2015 12:02 AM