रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय व स्वातंत्र्यवीर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २८ वे सावरकर साहित्य संमेलन जानेवारी महिन्यात रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. गतवर्षी हे संमेलन हैदराबाद येथे झाले होते. यावर्षी सावरकरांच्या कर्मभूमीत संमेलन होणार असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.स्वातंत्र्यवीर साहित्य अभ्यास मंडळाने सावरकरांच्या कर्मभूमीत साहित्य संमेलन होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे नगर वाचनालयाने पुढाकार घेऊन संमेलन आयोजित केले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आज, शनिवारी शहरातील साहित्यप्रेमींची सभा आयोजित केली आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अद्याप निश्चित करण्यात आले नसले तरी सावरकरांचे साहित्य असणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. मुलांचा सहभाग केवळ दिंडीपुरता न ठेवता युवक व मुलांना केंद्रस्थानी ठेवून संमेलनातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. संमेलनाची तारीख निश्चित नसली तरी जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात संमेलन होणार असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रत्नागिरीत सावरकर साहित्य संमेलन
By admin | Published: September 11, 2015 10:49 PM