कोल्हापूर : ‘पक्षी वाचवा - चिमणी वाचवा’ हा उपक्रम वर्षभर राबवावा, असे मत पक्षिप्रेमी विजय टिपुगडे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. संयुक्त उत्तरेश्वर पेठ शिवजयंती सोहळा समितीतर्फे ‘पक्षी वाचवा, चिमणी वाचवा’ अभियानांतर्गत पक्ष्यांची घरटी, पाणीपात्र, धान्यवाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. महालक्ष्मी अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी-जाधव प्रमुख पाहुणे होते. उत्तरेश्वर पेठेतील महादेव मंदिरातील चौकात हा विधायक उपक्रम घेण्यात आला.राजू मेवेकरी-जाधव म्हणाले, जे सामाजिक उपक्रम घेतले जातील, त्यांना आपले सदैव सहकार्य राहील. किशोर घाटगे म्हणाले, लहान व तरुण ही घरटी पेठेत तसेच पंचगंगा नदीवरील झाडांवर लावून त्यांमध्ये रोज पाणी व धान्याची सोय करणार आहेत. समितीचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रशांत संकपाळ, युवराज जाधव, सुरेश कदम, संदीप सुतार, गुरू पाटील, किशोर माने, अक्षय जाधव, शिवतेज सावंत, विनायक भोसले, आप्पा पट्टणशेटे, जलराज कदम यांच्यासह कार्यकर्त्ते उपस्थित होते. दीपक घोडके यांनी आभार मानले.
‘पक्षी वाचवा, चिमणी वाचवा’ अभियान वर्षभर राबवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2017 12:47 AM