आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २९: सर्वसामान्य शेतकऱ्याला आर्थिक फटका देणारी चुकीच्या पध्दतीची आॅन सातबारा व उतारा पध्दत तात्काळ बंद करावी, यासह विविध मागण्यांसाठी ‘शेतकरी वाचवा...बेरोजगारी हटवा...’अशी घोषणा देत महाराष्ट्र राज्य युवा क्रांती विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार व शेतकरी महासंघातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोटारसायकल रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.
दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथून या मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. नंदगाव, दिंडनेर्ली, इस्पुर्ली, कळंबा, संभाजीनगर, बिंदू चौकमार्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही रॅली आली. या ठिकाणी शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. खासगीकरण व कंत्राटीकरण तात्काळ बंद करण्यात यावे. चहा, कॉफी, मिठार्स व तेल आदी जीवनावश्यक वस्तूवरील वाढीव कर तात्काळ रद्द करण्यात यावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. धर्मादाय आयुक्त कार्यालयामधून अनेक सेवा संस्था, ट्रस्ट, सार्वजनिक मंडळे अशा नोंदणी करताना पॅन कार्ड, ई मेल आयडी यांची सक्ती करु नये.
धर्मादाय आयुक्त कार्यालय येथे मराठीतून करण्यात येणारी डाटा एंट्री इंग्रजीमध्ये करण्याचा घाट घातला जात आहे तो थांबवावा. शासकिय व निमशासकिय कार्यालयातील अंदाजे एक लाख ऐंशी हजार रिक्त जागांचा बोजा शासकिय कर्मचाऱ्यांवर पडला आहे. यासाठी रिक्त जागांवर नियुक्ती करुन बेरोजगारी कमी करावी, अशा विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. रॅलीमध्ये अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष सरदार जगताप, बापू शिंदे, आशा शेडगे, विशाल पाटील, सुदाम कांबळे, व्ही. बी. जाधव आदी सहभागी झाले होते.