कोल्हापूर 16 : येथील शाहू स्मारक भवनातील कलादालनात आठव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या नदी वाचवा-जीवन वाचवा या संकल्पनेवर आधारित छायाचित्र प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. हे प्रदर्शन रविवारपर्र्यत खुले आहे.
या प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, महोत्सवाचे संचालक विरेंद्र चित्राव, चंद्रहास रानडे, कृष्णा गावडे, प्राचार्य महादेव नरके, विजय टिपुगडे, अनिल चौगुले, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.
या छायाचित्र प्रदर्शनाला कसबा बावडा येथील जीवन कल्याण प्राथमिक विद्यालयाच्या ३१0 विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक उपस्थित होते. नदी वाचवा-जीवन वाचवा या संकल्पनेवर आधारित या छायाचित्र प्रदर्शनात राज्यभरातील ८० छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांचा समावेश आहे.
यानिमित्ताने घेण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यात आले असून कोल्हापूरातील लोकमतचे छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ, नाशिकचे किरण तांबट, गडहिंग्लजचे अशपाक किल्लेदार दीपक कुंभार, वैभव भाले, अवधूत गायकवाड यांच्या छायाचित्रांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.