गणेश शिंदे ।कोल्हापूर : केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेत आता कोल्हापूर महापालिकेच्या रविवार पेठेतील सावित्रीबाई फुले रुग्णालयाचा लवकरच समावेश होणार आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना आधार मिळणार आहे. गेल्या पाच महिन्यांत ‘आयुष्यमान’मधून कोल्हापूरतील ३०० जणांनी उपचार घेतले आहेत.
पहिल्या टप्प्यात सरकारी रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ८३ सरकारी रुग्णालयांत ही योजना सध्या सुरू आहे. या योजनेत एका कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मिळणार आहेत. या योजनेत १३०० आजारांचा समावेश आहे. जिल्ह्यात २५ सप्टेंबर २०१८ ला ही योजना सरकारी रुग्णालयांत सुरू झाली. गेल्या पाच महिन्यांत ३०० लाभार्थ्यांनी ( २६ फेब्रुवारी २०१९ अखेर) उपचार घेतले आहेत.दरम्यान, सावित्रीबाई फुले रुग्णालयात सर्वप्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आहेत. त्यामध्ये अतिदक्षता विभागात सहा खाट, ३६ डॉक्टर, २७ नर्सिंग आदींचा समावेश आहे. या सर्व सुविधा असल्यामुळे ‘आयुष्यमान’मध्ये समावेश होण्यासाठी केंद्र स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे. या रुग्णालयात काही महिन्यांपूर्वीच ‘महात्मा फुले’ योजना सुरू झाली. त्यामुळे आता महात्मा फुले योजनेबरोबर ‘आयुष्यमान’मधील उपचाराचाही लाभ सर्वसामान्यांना मिळणार आहे.महात्मा फुले, ‘आयुष्यमान’चे एकत्रिकरणराज्य सरकारची महात्मा जोतिबा फुले योजना व केंद्र सरकारची ‘आयुष्यमान जनआरोग्य योजना’ आहे. या दोन्ही योजनांत एकसारख्या आजारांचा समावेश आहे. या दोन्ही योजनांचे एकत्रिकरण सरकारने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा सर्वसामान्यांना (पिवळे व केशरी रेशनकार्डधारक) होणार आहे. या दोन्ही योजनांमुळे रेशनकार्ड लिंक होणार आहे. दोन्ही योजनांतील साडेसहा लाख रुपयांचे वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होणार आहे. मात्र; यासाठी ‘आयुष्यमान’च्या पत्रकात (ओळखपत्र) संबंधित कुटुंबप्रमुखाचे नाव असले पाहिजे.‘आयुष्यमान’चे ब्रॅडिंगखासगी रुग्णालयात सुरूकोल्हापूर जिल्ह्यात ‘महात्मा फुले’मध्ये ३१ रुग्णालये समाविष्ट आहेत. या अंगीकृत रुग्णालयांत ‘आयुष्यमान’चे बॅ्रडिंग सुरू झाले आहे. योजनेचे फलक या खासगी रुग्णालयात लावण्यात आले आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवरून निविदा काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच खासगी रुग्णालयात आयुष्यमान सुरू होण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्यांचे आधारवड ठरलेली आयुष्यमान योजना येत्या ५ दिवसांत सावित्रीबाई फुले रुग्णालयात सुरू करण्याचा मानस आहे. - डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक,आयुष्यमान भारत योजना,कोल्हापूर.