जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल ऊर्फ सावकर मादनाईक एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर स्वाभिमानीला मोठा धक्का बसणार आहे. याबाबत कोल्हापुरातून राजकीय खलबत्ते घडली असून, मादनाईक यांचा लवकरच निर्णय होणार असल्याचे समजते.गेली २० वर्षे माजी खासदार राजू शेट्टींच्या खांदाला खांदा लावून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी सुरू ठेवले आहे. शेट्टींचे सुरुवातीपासूनचे ते खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. ‘स्वाभिमानी’च्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ते प्रमुख शिलेदार म्हणून ओळखले जातात. सन २०१४ व २०१९ मध्ये त्यांनी शिरोळ विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांची भूमिका आतापर्यंत राहिली आहे. विधानसभेच्या तोंडावर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. मादनाईक यांना शिंदेसेनेत येण्याचा प्रस्ताव आला आहे. त्याबाबत कोल्हापूर येथून राजकीय घडामोडी घडल्याचे वृत्त आहे. मादनाईक हे शिंदेसेनेसोबत गेल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजकीय भूकंप होणार आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर स्वाभिमानीला हा मोठा धक्का मानला जाईल. त्यामुळे येणाऱ्या काळात कशा घडामोडी घडतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आली आहे. सन्मानाचे पद मिळत असेल तर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार आहे. गेली २० वर्षे स्वाभिमानीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी चळवळ सुरू ठेवली आहे. ही चळवळ कायम ठेवून राजकारणात वेगळा निर्णय घेऊ; पण सन्मानाचे पद मिळायला पाहिजे. शिंदे गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आली आहे. त्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. सन्मानाचे पद मिळाले तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. दोन वेळा विधानसभा निवडणूक लढविली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढविणार नाही. - सावकर मादनाईक