सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईने खऱ्या अर्थांने मोकळा श्वास घेतला. भाजी मंडईतील दहा बारा बेकायदेशीर असलेली दुकाने नगरपालिकेने काढून टाकली.कोणत्याही पोलीस बंदोबस्ताशिवाय हे अतिक्रमण हटविण्यात आले असून, भाजी मंडईत जाणारा रस्ताही मोकळा झाला आहे.
या अतिक्रमाणात काहिंनी मोठ्या प्रमाणात जागा बळकावली होती. ती जागा रिकामी करण्यात पालिकेला यश आले आहे. ही कारवाई सकाळी दहा वाजल्यापासून हाती घेण्यात आली होती, ती सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यातच मुख्य संकुलात ज्यांना दुकाने देण्यात आली होती, त्यांनीही या ठिकाणचे व्यापारी गाळे आपल्याकडे ठेवले होते. तसेच काही मंडईतील दुकानदारांनीही मोठ्या प्रमाणात जागा व्यापली होती.मंडईत येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांना आतमध्ये शिरण्यास रस्ताही मिळत नव्हता. कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्स पाळले जात नव्हते. मंडईमध्ये कचरा गाडी जात नव्हती, याबाबत नगराध्यक्ष संजू परब यांनी मंडईची पाहणी केली होती. तसेच या मंडईमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे, हे अतिक्रमण तातडीने काढावे तसेच फिरत्या विक्रेत्यांना योग्य ती जागा देण्यात यावी असा आदेश प्रशासनाला दिला होता. त्याप्रमाणे हे अतिक्रमण हटवण्यास सुरूवात करण्यात आली.शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून संत गाडगेबाबा भाजी मंडईतील हे अतिक्रमण हटवण्यास सुरूवात करण्यात आली. अतिक्रमण हटविण्यासाठी बांधकाम अभियंता संतोष भिसे, मुख्य लिपीक आसावरी शिरोडकर, बाबा शेख, दीपक म्हापसेकर, प्रदीप सावरवाडकर, गजानन परब, मनोज सुकी आदिंसह अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती.
अतिक्रमण हटविण्यासाठी सर्व कामगारांनी सुरूवात केली. सुरूवातीच दुकान हटविताना दुकानदार आणि पालिका यांच्यात थोडीशी गरमागरम चर्चा झाली. मात्र, त्यांना काहि दिवसांची मुदत दिल्यानंतर पुढील अनधिकृत दुकाने हटविण्यास सुरूवात करण्यात आली.
यामध्ये फिरत्या विक्रेत्यांनाही बाजूला करण्यात आले आहे. तसेच मंडईत काहि मोठ मोठी जागा अडवली. त्यांनाही जेवढा दुकान गाळा आहे त्यामध्येच आपले दुकान लावण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.