कोल्हापूर : सर्व जातिधर्मांतील लोकांना सोबत घेऊन, हिंदवी स्वराज्य स्थापन करून जनकल्याणाचे काम करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवरच बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची वाटचाल राहिली. त्यांच्या अंगी शिवरायांचे गुण बाणले गेल्याने त्यांनी अनेक वर्षे इंग्रजांना गुंगारा दिला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड (औरंगाबाद) यांनी येथे केले.शाहू स्मारक भवन येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्याकोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे आयोजित शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेत ‘सयाजी महाराजांच्या नजरेतून छत्रपती शिवराय’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक बंडोपंत सावंत होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, डॉ. संदीप पाटील, बंडा महाराज यादव, सुहास निंबाळकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.बाबा भांड म्हणाले, छत्रपती शिवरायांचे सर्व जातिधर्मांतील लोकांना सोबत घेऊन जाणे व जनकल्याणाचे काम करणे हे गुण अंगीकारत सयाजी महाराजांनी आपली वाटचाल सुरू ठेवली. शिवरायांचे गुण अंगी बाणले गेल्याने सयाजी महाराजांनी अनेक वर्षे इंग्रजांच्या गुप्तहेर खात्यालाही गुंगारा दिला.ते पुढे म्हणाले, कळवणा (जि. नाशिक) येथील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा नंतर सयाजी महाराज यांच्या रूपाने बडोद्याचा राजा बनला. ते दूरदृष्टी असलेले राजे होते. जनकल्याणामध्येच आपला मोक्ष आहे, या विचारातून त्यांनी कार्य सुरू ठेवले. अस्पृश्य आणि आदिवासींच्या शिक्षणासाठी आपल्या संस्थानात त्यांनी हुकूम काढला. तो जगातील पहिला हुकूम होता. संस्थानात शाळा स्थापन केल्या, वसतिगृहे बांधली, विद्यार्थ्यांना पाटी व पेन्सिल देत महात्मा फुले यांच्या विचाराने काम केले. भारतातील पहिली भाषांतर शाखा त्यांनी बडोद्यात सुरू केली. शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत भरीव काम केल्याने ब्रिटिशांनाही त्यांचा हेवा वाटू लागला.राजू परांडेकर यांनी स्वागत केले. वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविक केले. इंद्रजित सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संतोष पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्रकाश पाटील, निवृत्ती पाटील, अवधूत पाटील, भगवान काटे, गुलाबराव घोरपडे, आदी उपस्थित होते.भाऊबंदकीने मराठा साम्राज्य गुंडाळलेजगाचा इतिहास पाहिल्यास अनेक राज्यकर्त्यांनी ५०० ते ६०० वर्षे सत्ता गाजविल्याचे दिसत आहे. तसेच कपडे उत्पादन करणाऱ्या कंपन्या जवळपास ४०० वर्षे चालल्या; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले मराठा साम्राज्य हे १७५ वर्षांतच गुंडाळले. त्याला कारण म्हणजे मराठा समाजातील भाऊबंदकी होय. भाऊबंदकी म्हणजे मराठ्यांचे आवडते क्षेत्र आहे. प्रसंगी विरोधकांना मदत झाली तरी चालेल या वृत्तीनेच १७५ वर्षांतच मराठा साम्राज्य गुंडाळले. हे आताच्या मराठ्यांनी लक्षात घ्यावे, असे बाबा भांड यांनी सांगितले.