भीमगोंडा देसाई-- कोल्हापूर --जिल्ह्यात मोठ्या, मध्यम, लघु अशा सर्वच धरणांत गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्या निम्म्याहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी १३ एप्रिलअखेर सर्व तलावांत ५६.९६ टीएमसी, तर यंदा त्याच तारखेला केवळ ३२.५६ टीएमसी पाणी शिल्लक होते. त्यामध्ये चार दिवसांत पुन्हा घट झाली आहे. दरम्यान, पाऊस सुरू होईपर्यंत शिल्लक साठा पिण्यासाठी, सिंचनासाठी वापरावा लागणार आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने पाणी वापरासंबंधी केलेल्या नियोजनाचे काटेकर पालन न झाल्यास शहरासह ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. ‘पाण्याचा जिल्हा’ अशी कोल्हापूरची राज्यात ख्याती आहे. १९७२ नंतर येथे कधीही पाणीटंचाईचे गडद सावट जाणवले नाही; परंतु, गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सर्व धरणे क्षमतेइतकी भरली नाहीत. विहिरी, ओढे, नाले भरून वाहिले नाहीत. त्यामुळे दीर्घ काळानंतर पहिल्यादांच जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्रपणे जाणवत आहे.उष्णता वाढल्याने सर्वच तलावांतील पाणी उपसा वाढला आहे. परिणामी, पाणीपातळी झपाट्याने खाली येत आहे. पहिल्यांदा पिण्यासाठी पाणी आरक्षित केले आहे. शिल्लक पाणी उपसाबंदी करून सिंचनासाठी दिले जात आहे; परंतु, उन्हाच्या झळा वाढल्याने ऊस, भाजीपाला, आदी पिके वाळत असल्याने सैरभैर झालेले काही संबंधित शेतकरी उपसा बंदीच्या वेळी आकडा टाकून वीज घेऊन विद्युत पंप सुरू करत आहे. त्यामुळे आरक्षित पाणी नियोजन कोलमडत आहे. हे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे म्हणूनच वीज वितरण कंपनीला सतर्क राहण्याची सूचना दिली आहे.५३ लघुपाटबंधारे प्रकल्पराधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा असे चार मोठे प्रकल्प आहेत. या धरणांत १४.७८ टीएमसी पाणी आहे. गतवर्षापेक्षा २८.८७ टीएमसी पाणी कमी आहे. नऊ मध्यम धरणात ७.५९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीपेक्षा २.५४ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. ५३ लघुपाटबंधारे प्रकल्पांत गेल्यावर्षी पेक्षा ३.३८ टीएमसी पाणी कमी आहे, तर सध्या २४.६० टीएमसी पाणी शिल्लक आहे. कमी लघुप्रकल्पांतही १.१५ टीएमसी पाणी गतवर्षापेक्षा कमी आहे.
टंचाईचे सावट गडद
By admin | Published: April 25, 2016 12:36 AM