आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0७ : गेले दोन-तीन दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भात व नागलीचे तरू लागणीस आले आणि पावसाने उघडीप दिल्याने रोपलागणीची कामे खोळंबली आहेत. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे नुसती भूरभूर सुरू असून चोवीस तासांत सरासरी ३.७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात चांगला पाऊस सुरू झाल्याने खरीप पिके जोमात आहेत; पण पश्चिमेकडील पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा तालुक्यात भात व नागलीची रोपलागण मोठ्या प्रमाणात केली जाते. रोपलागणीस चिखल करण्यासाठी पावसाची गरज असते, पण गेली दोन-तीन दिवस पावसाने एकदम दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यातच भात व नागलीचा तरवा टाकल्याने महिन्याभरात तरू (रोप) लागणीसाठी परिपक्व झाले आहे. त्यात पावसाने उघडीप दिल्याने रोपलागणी लांबणीवर पडली आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३.७४ मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ९ मिलीमीटर झाला. हातकणंगले, शिरोळ तालुक्यात निरंक तर करवीर, कागल, पन्हाळा तालुक्यात तुरळक सरी कोसळल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने नद्यांची पातळी कमी झाली असून पंचगंगेची पातळी १७ फुटांपर्यंत खाली आली आहे. अद्याप नऊ बंधारे पाण्याखाली आहेत.
राधानगरी निम्मे भरले!
जिल्ह्यात पाऊस कमी असला तरी धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस असल्याने धरणांची पातळी हळू-हळू वाढू लागली आहे. राधानगरी धरण ५१ टक्के भरले असून तुळशी, कडवी, कुंभी, पाटगांव, कासारी धरणात ५० टक्क्यांपेक्षा जादा पाणीसाठा आहे.