विश्वास पाटील।
पंतप्रधानांनी विविधतेलाच आव्हान दिले आहे. त्यांनी सर्वधर्मीयांना समान वागणूक द्यायला हवी, पण अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जा दिला जात आहे. हिंदू-मुस्लीम आधारावर नागरिकत्व कायदा बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मला वाटते, हाच देशद्रोह आहे. --योगेंद्र यादव
कोल्हापूर : देशात फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, राफेलमधील भ्रष्टाचार हेच मुद्दे ऐरणीवर होते; परंतु त्यामध्ये आपला निभाव लागणार नसल्याचे लक्षात आल्यावर घाबरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निवडणुकीचा सिलॅबसच बदलला आणि ते आता दहशतवादाविरोधातील युद्धाच्या मागे लपून ही निवडणूक लढवू पाहत आहेत, अशी टीका अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे नेते व ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.या निवडणुकीचे तुम्हाला कायवेगळेपण वाटते?ही निवडणूक इतिहासातील तिसरी महत्त्वाची निवडणूक आहे. पहिल्या १९५२ च्या निवडणुकीने हे दाखवून दिले की, गरीब व अज्ञानी भारतातही लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली जाऊ शकते. पुढे १९७७ ला याच लोकशाहीला आणीबाणीचे नख लागले तेव्हा जनतेने त्याला कडाडून विरोध केला व लोकशाही वाचविण्यासाठीच ही निवडणूक झाली. यंदाच्या निवडणुकीत भारताचा मूळ स्वधर्म वाचविण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने शेतकरी व बेरोजगारांचे नुकसान तर केलेच, पण लोकशाहीच्या तीन मजबूत स्तंभांवरच हल्ला केला. हे तीन स्तंभ म्हणजे स्वातंत्र्य, विविधता व विकास. मोदी सरकारने संसद, न्यायपालिका व प्रशासन या प्रत्येक संस्थेचा गळा घोटण्याचे काम केले आहे. आणीबाणीत नव्हती, तेवढ्या दबावाखाली आज माध्यमे आहेत. यामुळे मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर भारतातील लोकशाही राजवटीचे बोन्साय होऊन जाईल.राजकीय सद्य:स्थितीविषयीतुम्हाला काय वाटते?पुलवामातील दहशतवादी हल्ला व भारताने बालाकोट येथे केलेला हवाई हल्ला हे दोन्ही मुद्दे राष्ट्रीय सुरक्षेशी जोडले गेले आहेत. त्याबद्दल देशातील कुणाच्याच मनांत शंका किंवा दोन प्रवाह नाहीत. सुरक्षा दलाच्या कारवाईबद्दल सर्व भारतीयांमध्ये अभिमानाचीच भावना आहे. या शौर्याबद्दल आम्ही जवानांना सलामच करतो; पण त्यांचे मोठेपण सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा निवडणुकीसाठी वापर करणे गैर आहे. दहशतवादाच्या विरोधातील कारवाई आणि निवडणूक या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यांची सरमिसळ करून मोदी निवडणूक लढवू पाहत आहेत. हवाई हल्ल्यामुळे त्यांना काहीशी सहानुभूती जरूर मिळाली; परंतु ‘मिशन शक्ती’ ही उपग्रह पाडण्याची चाचणी यशस्वी केल्यानंतर त्यांचा त्यामागील खटाटोप सर्वांच्याच लक्षात आला. यामागे देशभक्ती कमी व निवडणुकीचे राजकारणच जास्त होते.निवडणुकीच्या आधी जे वातावरण होते, त्याला मोदी घाबरले; पण पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात जवानांचे रक्त सांडले आणि यांच्या तोंडाला पुन्हा सत्तेचे पाणी सुटले. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत सारा देश त्यांच्यासोबत आहे; परंतु त्यांनी त्याचे श्रेय घेता कामा नये. जगण्या-मरण्याचे प्रश्न बाजूला पडून राष्ट्रवाद, स्वाभिमान, देशद्रोह याभोवती ही निवडणूक केंद्रिभूत व्हावी असे प्रयत्न सुरू आहेत.मोदींना पर्याय काय? याचे उत्तर लोकांकडे नाही. स्वच्छ दृष्टिकोन, विकासाचा कृती कार्यक्रम व मजबूत नेतृत्व यांवर आधारित प्रामाणिक आघाडीचा पर्याय त्याच्यासमोर नाही.