इचलकरंजी : एका चित्रपटातील संवादाचा व्हिडिओ करून हातात बंदूक घेत दहशत निर्माण होईल, असा स्टेट्स ठेवल्याप्रकरणी तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.
मोहसीन अमीर फकिर (वय १९, रा. कबनूर), अभिजीत राजाराम तावदारे (२९, रा. गोकुळ चौक) व हैदर मन्सूर मुजावर (२१, रा. बागडे गल्ली) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कबनूर (ता.हातकणंगले) येथील मोहसीन याने आपल्या दोन मित्रांना सोबत घेऊन हातात बंदूक घेत मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण केले. त्याला एका मराठी चित्रपटातील संवाद जोडला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर स्टेट्स ठेवून व्हायरल करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समजताच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेली बंदूक ही लायटर असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापुढेही दहशत माजविणारे स्टेट्स ठेवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी केले.