लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी पावसाची भुरभुर सुरू आहे. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू असून आज, बुधवारपासून पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मंगळवारपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असला तरी कोल्हापुरात त्याला ताकद लागत नाही. मराठवाड्यासह सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, कोल्हापुरात ढगाळ वातावरणासह भुरभुर सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चाेवीस तासांत सर्वाधिक पाऊस ९.५ मिली मीटर झाला आहे. धरणक्षेत्रातही चांगला पाऊस सुरू आहे, विसर्गही सुरू असून राधानगरीतून प्रतिसेकंद १४०० घनफूट, तर वारणातून ८१७ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अद्याप चार बंधारे पाण्याखाली आहेत.
दरम्यान, आज, बुधवारपासून पावसाचा जोर वाढेल, असा अंंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वातावरणात गारठा वाढला
जिल्ह्यात पाऊस कमी असला तरी वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. तापमानात घट झाली असून जिल्ह्याचे कमाल तापमान २५ डिग्रीपर्यंत खाली आल्याने थंड हवामान जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.