कोल्हापूर : विविध रूपांतील आकर्षक गणेशमूर्ती, तांत्रिक देखावे, लक्षवेधक विद्युत रोषणाई आणि समाजप्रबोधनपर सजीव देखावे पाहण्यात कोल्हापूरकरांनी रविवारीची रात्र जागविली. बहुतांश मंडळांनी देखावे खुले केल्याने शहरासह उपनगरांमधील विविध परिसरांत नागरिकांनी गर्दी केली होती. घरगुती गणेश विसर्जनानंतर शनिवार (दि. १०) पासून शहरातील विविध मंडळांचे देखावे खुले झाले; पण देखावे पाहण्यास तुरळक गर्दी दिसून आली. मात्र, रविवारची सुटी असल्याने शहरासह उपनगरांतील अनेक नागरिक सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी सायंकाळी सातनंतर बाहेर पडले. आरती झाल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास अनेक मंडळांचे देखावे खुले झाले. यापूर्वी विविध रूपांतील गणेशमूर्तींचे दर्शन नागरिकांकडून घेण्यात येत होते. तांत्रिक देखावा, आकर्षक गणेशमूर्ती आणि लक्षवेधक सजावटीचा संगम असलेल्या राजारामपुरीत नागरिकांची गर्दीच गर्दी दिसून आली. सजीव देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मंगळवार पेठ, बुधवार पेठ आणि शिवाजी पेठ परिसरातील देखावे सुरू होण्यापूर्वीच या ठिकाणी लोक थांबून होते. मंगळवार पेठेतील लेटेस्ट तरुण मंडळाचा ‘क्रांतिज्योती आजच्या युगात’, प्रिन्स क्लबचा ‘वसुंधरेला हाक’ हे देखावे खुले झाले. या ठिकाणी नागरिकांची पावले थबकली. तांत्रिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, शिवाजी उद्यमनगर येथील जवळपास सर्वच मंडळांचे देखावे रविवारी खुले झाले. शाहूपुरी चौथ्या गल्लीतील ‘नॉटी कार्टून’ हा तांत्रिक देखावा, शिवाजी उद्यमनगरमधील मदनलाल धिंग्रा तरुण मंडळाच्या पोकोमॅनमधील पिकाच्यूचा देखावा पाहून बच्चेकंपनी आनंदित झाली. आकर्षक विद्युत रोषणाईचा गणेश दरबार, शिवराज्याभिषेक सोहळ्याची ६० फुटी कमान, आशीर्वाद देणारा गणेशाचा तांत्रिक देखावा लक्षवेधक ठरला. लालबाग राजाची प्रतिकृती, सिंहासनाधीश गणपती, नऊमुखी गणेशमूर्ती, समुद्रमंथन देखाव्यासह मंगळवार पेठेतील आकर्षक गणेशमूर्ती अनेकांनी नजरेत साठविल्या. शनिवार पेठेतील न्यू अमर मित्रमंडळाचे दोन कार्यकर्ते अपघातात ठार झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील काही मंडळांनी देखावे बंद ठेवल्याने येथे शांतता दिसून आली. लक्ष्मीपुरीतील ४२ फुटी बालाजीची मूर्ती, सुभाष रोडवरील आकर्षक गणेशमूर्ती अनेकांनी मोबाईलमध्ये टिपून घेतल्या. शिवाजी चौकातील २१ फुटी महागणपती आणि छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. शहरासह फुलेवाडी, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, कसबा बावडा, आदी परिसरांत गर्दी दिसून आली. शनिवार (दि. १०)च्या तुलनेत रविवारी गर्दी वाढली होती. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह द्विगुणित झाला होता. शाहूपुरी, राजारामपुरी परिसरांत खाद्यपदार्थांचे तसेच विविध खेळांच्या साहित्याचे स्टॉल्स मांडले होते. देखावे पाहण्यासाठी सहकुटुंब आलेले नागरिक, महाविद्यालये व शाळांमधील मित्र-मैत्रिणींसह आलेले युवक-युवती या पदार्थांचा आस्वाद घेत पुढील देखावे पाहण्यासाठी जात होते. शहरवासीयांनी देखावे पाहण्यात रात्र जागविली. (प्रतिनिधी) पोलिसांची वॉच टॉवरवरून नजर ४देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन राजारामपुरी, शिवाजी चौक तसेच अन्य ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. राजारामपुरीच्या मुख्य रस्त्यावर लोखंडी दुभाजक लावले आहेत. ४शिवाय पोलिस प्रशासनाने वॉच टॉवर उभारले आहेत. गर्दीचे नियोजन करण्यासाठी सर्वच चौकांमध्ये वाहतूक पोलिस तैनात होते. ‘सेल्फी’ची घाई अनेक मंडळांच्या विविध रूपांतील आकर्षक गणेशमूर्ती आहेत. त्यांच्यासमवेत तसेच काही मंडळांनी केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईच्या ठिकाणी अनेकांची ‘सेल्फी’ घेण्याची घाई सुरू होती. यासाठी काहीजण ‘सेल्फी स्टिक’चा वापर करीत होते.
देखावे खुले; रस्ते फुलले!
By admin | Published: September 12, 2016 12:40 AM