संतोष मिठारी - कोल्हापूर -कामकाजाचा आठवडा पाच दिवसांचा की सहा दिवसांचा राहणार, याबाबत अद्यापही अनेक शाळांना स्पष्टीकरण मिळालेले नाही. त्यामुळे वार्षिक कामकाजाचे वेळापत्रक कसे करायचे, याबाबत प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे.वार्षिक आणि मासिक कामकाजात सुसूत्रता असावी, या उद्देशाने शाळांमध्ये वार्षिक नियोजनाचे वेळापत्रक तयार करण्यात येते. यात इंग्रजी, मराठी, भाषा, कला, आदी विषयांच्या मासिक तासिका निश्चित केल्या जातात. वेळापत्रक बनविण्याच्या प्रक्रियेत पहिल्यांदा वर्षाचे त्यानंतर मासिक, घटक आणि दैनंदिन पाठ टाचण यांचे नियोजन पक्के केले जाते. शिवाय शैक्षणिक तसेच कला, सांस्कृतिक व क्रीडा विषयक उपक्रम निश्चित केले जातात. शालेय शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वार्षिक वेळापत्रक तयार केले जाते. उन्हाळी सुटीनंतर शाळा सुरू होण्यापूर्वीच हे वेळापत्रक तयार केले जाते. मात्र, एप्रिलमध्ये शासनाने पहिली ते सहावीपर्यंतच्या शाळांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचे घोषित केले. मात्र, त्याची अंमलबजावणी या वर्षीपासून होणार, की पुढील वर्षी होणार, यात कोणत्या विभागातील शाळांचा समावेश केला जाणार याबाबत अद्यापही शालेय शिक्षण विभागाकडून शाळांना स्पष्टीकरण मिळालेले नाही. त्यामुळे वार्षिक वेळापत्रक पाच की सहा दिवसांच्या आधारावर करायचे याबाबत प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक संभ्रमावस्थेत आहेत. वेळेत स्पष्टीकरण मिळाल्यास शाळांसाठी ते सोयीस्कर ठरणारे आहे. स्पष्टीकरणाची प्रतीक्षा...वेळापत्रक बनविण्याची प्रक्रिया काहीशी किचकट स्वरूपातील असते. त्यामुळे वेळापत्रक एकदा बनविल्यानंतर त्यात बदलाबदली करावी लागू नये, यासाठी बहुतांश शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक हे शिक्षण विभागाकडून लेखी स्वरूपात स्पष्टीकरण मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. त्यापूर्वी वेळापत्रक बनविणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर शिक्षण विभागाने आठवड्याच्या दिवसांबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी शिक्षकांची मागणी आहे.पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश मुंबई व ठाणे विभागातील शाळांना देण्यात आले आहेत. अन्य विभागांबाबत काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे येथील शाळांमधील शिक्षकांत वार्षिक वेळापत्रक तयार करणे, आदींबाबत संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्यासाठी राज्य पातळीवर शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट आदेश लवकर द्यावेत.- राजेंद्र कोरे, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक व शिक्षकेतर महासंघ
शाळांच्या वार्षिक वेळापत्रकाचे त्रांगडे
By admin | Published: May 15, 2015 12:12 AM