कोल्हापूर : एम.बी.ए. अभ्यासक्रमाचे शिवाजी विद्यापीठाने जाहीर केलेले वेळापत्रक विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरणारे आहे, ते बदलावे, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांत तीन वेळा निवेदन देऊन काहीच कार्यवाही झाली नाही. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेना शहर शाखा व विद्यार्थी सेनेने विद्यापीठात आंदोलन केले. आंदोलनानंतर विद्यापीठाने एम.बी.ए.च्या चार पेपरचे वेळापत्रक बदलले.विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांतील एम.बी.ए. भाग एकच्या परीक्षा २२ जूनपासून सुरू होत आहे. मात्र, परीक्षा विभागाने एम.बी.ए. प्रथम वर्ष सत्र एक आणि सत्र दोनचे पेपर एकाच दिवशी ठेवले होते. त्याचा विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होणार होता. ते लक्षात घेऊन शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेने या पेपरचे वेळापत्रक बदलावे या मागणीचे निवेदन १६ मार्च व २१ आणि २९ एप्रिल रोजी परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांना दिले होते. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे शिवसेनेच्या शहर शाखेने विद्यापीठात निदर्शने केली. दुपारी साडेबारा वाजता आंदोलकांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारला. या ठिकाणी त्यांनी ‘ एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘निष्काळजी परीक्षा नियंत्रकांचा धिक्कार असो’अशा घोषणा सुरू केल्या. दोन वाजेपर्यंत त्यांची निदर्शने सुरू होती. विद्यापीठ प्रशासनाने त्याची माहिती विद्यापीठ कॅम्पसबाहेर गेलेल्या प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांना दिली. त्यानंतर दहा मिनिटांतच डॉ. भोईटे विद्यापीठात आले. त्यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलाविले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस आणि विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख चेतन शिंदे यांनी एकाच दिवशी दोन पेपर होणे हे विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरणारे आहे. सर्व पेपर बदलणे जिकिरीचे असल्यास विद्यापीठाने विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे पेपर पुढे ढकलावेत, अशी मागणी केली. त्यावर डॉ. भोईटे यांनी प्रभारी परीक्षा नियंत्रक जी. बी. पळसे यांच्याशी चर्चा करून चार पेपर पुढे ढकलले. आंदोलनात शिवसेना उपशहरप्रमुख रमेश खाडे, राजू पाटील, बापू साळोखे, अमित चव्हाण, विशाल देवकुळे, माजी नगरसेवक कैलास गौडदाब, आदींसह विद्यार्थी, विद्यार्थिनी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)पेपरच्या सुधारित तारखामॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक फॉर मॅनेजमेंट : १ जूनमॅनेजीरियल इकॉनॉमिक्स : २ जूनआॅर्गनायझेशनल बिहेव्हिअर : ३ जूनलीगल फ्रेमवर्क आॅफ बिझनेस : ४ जून
एम.बी.ए.च्या पेपरचे वेळापत्रक बदलले
By admin | Published: May 15, 2015 11:44 PM