लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती (व्हीजेएनटी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) आणि अनुसूचित जाती (एससी) या प्रवर्गातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमांच्या ३९० महाविद्यालयांमध्ये एकूण १७०२८ विद्यार्थ्यांचे या शिष्यवृत्तीचे अर्ज अडकले आहेत. मार्च एन्डिंग (अखेर) आठ दिवसांवर येऊन ठेपली असून देखील अद्याप ४५ टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडून कोल्हापुरातील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयाकडे दाखल झालेले नाहीत.
कला, वाणिज्य, विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमासह व्यवस्थापन, फार्मसी, पॉलिटेक्निक, कलानिकेतन आदी विविध महाविद्यालयांतील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाते. अभ्यासक्रमाच्या शुल्कनिहाय ही शिष्यवृत्ती मिळते. गेल्यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील ४१३७० विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केली होती. मात्र, यावर्षी आतापर्यंत ३४५४९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ८० टक्के आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज छाननी करून महाविद्यालयांनी समाजकल्याण कार्यालयाकडे ऑनलाईन प्रणालीतून पाठविण्याचे प्रमाण कमी दिसत आहे. त्याबाबत समाजकल्याण विभागाच्या पुणे विभागातील प्रादेशिक आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. या शिष्यवृत्तीसाठी राज्य शासनाने दिलेला निधी दि. ३१ मार्चपूर्वी वितरित करणे आवश्यक असते. शासनाने निधीही दिला आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे महाविद्यालयांकडून अद्याप ४५ टक्के विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण कार्यालयाकडे आलेले नाहीत. हे अर्ज लवकर पाठवून देण्याबाबत मार्चच्या सुरुवातीपासून या कार्यालयाकडून महाविद्यालयांना वारंवार पत्रे पाठविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून अजूनही कार्यवाहीची गती वाढली नसल्याचे चित्र आहे. मार्च एन्डिंगला आठ दिवस उरले आहेत. त्यामुळे वेळेत अर्ज केलेल्या १७०२८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार हा प्रश्न आहे.
चौकट
महाविद्यालयांना शुक्रवारची डेडलाईन
कोल्हापुरातील महाविद्यालयांतील एकूण ३४५४९ विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केली. त्यातील १७५२१ विद्यार्थ्यांचे महाविद्यालयांकडून प्राप्त झालेले अर्ज समाजकल्याण कार्यालयाने मंजूर केले आहेत. अद्याप १७०२८ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांकडून प्राप्त झालेले नाहीत. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेण्याची कार्यवाही तत्काळ करावी. आर्थिक वर्ष संपण्यास काही दिवस उरले आहेत. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयांनी शुक्रवार (दि. २६) पर्यंत ऑनलाईन प्रणालीतून समाजकल्याण कार्यालयाकडे वर्ग करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
चौकट
तांत्रिक अडचणी
या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकाची केलेली दुहेरी नोंदणी, मोबाईल क्रमांक बदलल्याने मिळत नसलेला ओटीपी, आदी तांत्रिक अडचणींचा महाविद्यालयांना भेडसावत आहेत.
पॉंईंटर्स
१) जिल्ह्यातील महाविद्यालये : ३९०
२) महाविद्यालयांत एकूण प्रलंबित अर्ज : १७०२८
प्रवर्गनिहाय प्रलंबित अर्ज
१) ओबीसी : ५६८७
२) एसबीसी : ११६३
३) व्हीजेएनटी :३५८०
४) एससी : ६५९८