कोल्हापूर : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील शाळेत विद्यार्थ्यांचा ओढा वाढावा म्हणून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढील शैक्षणिक वर्षापासून पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जे विद्यार्थी यश संपादन करतील, अशांना प्रतिमहा २०० रुपये याप्रमाणे वार्षिक २४०० रुपये देण्यास आयुक्त पी. शिवशंकर यांनी मान्यता दिली आहे. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत बहुसंख्येने यश संपादन करावे यासाठी शालेय स्तरावर पाचवी व आठवीच्या विद्यार्थांकरिता सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. जे विद्यार्थी अंतिम शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करतील अशांना वार्षिक २४०० रुपये, ट्रॉफी व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. त्याकरिता मनपाच्या सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेली आहे. सध्या मनपाच्या सहा शाळेत ई-लर्निंगची सोय असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून आणखी २५ शाळांसाठी ई-लर्निंग सुविधा (प्रोजेक्टर) पुरविण्यात येणार आहे. त्याकरिताही तरतूद केली आहे.सध्या महापालिकेच्या ५९ शाळेत संगणक सुविधा पुरविली असली तरी पुढील वर्षापासून आणखी २५ संगणक खरेदी केले जाणार आहेत. तसेच आणखी तीन शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले जाणार असून, त्याकरिता आवश्यक त्या शैक्षणिक अर्हतेचे शिक्षक व साधने, सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नवीन तरतुदी असलेले अंदाजपत्रक नुकतेच शिक्षण समितीने स्थायी समितीकडे सादर केले. (प्रतिनिधी)
मनपा शाळेत शिष्यवृत्ती
By admin | Published: March 28, 2017 12:11 AM