कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे दरवर्षी ५ वी ८ वीसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांची तारीख अखेर निश्चित झाली आहे. सैनिकशाळा प्रवेश पुनर्परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा एकाच वेळेवर आल्याने राज्यभर संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शिष्यवृत्ती परीक्षेची वेळ बदलल्याने आता येत्या २४ फेब्रुवारीला राज्यभरात एकाच दिवशी दुपारी १ ते सायंकाळी ५ या वेळेत दोन पेपर होणार आहेत.५ वी व ८ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे हे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षापासून ४ थी व ७ वी परीक्षा रद्द करून त्याऐवजी ५ वी ८ वी साठी परीक्षा घेण्यात येत आहे. गेल्या वर्षी पहिलेच वर्ष असल्याने काहीसा संभ्रम होता. यावर्षी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडेल असे सांगण्यात येत होते. तथापि सातारा येथील सैनिकशाळा प्रवेशाची पुनर्परीक्षा २४ रोजी जाहीर करण्यात आली.
ही परीक्षा सकाळी १0 वाजता होणार होती. तथापि याचवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेही याच तारखेवर, याच वेळेवर शिष्यवृत्ती परीक्षा घेत असल्याचे जाहीर केले. एकाच वेळी परीक्षा असल्याने गोंधळ निर्माण झाल्याने अखेर सैनिकी शाळेने राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याशी पत्रव्यवहार करून वेळ बदलण्याची मागणी केली होती. त्यांची ही मागणी परिषदेने मान्य केली असून, वेळापत्रकात बदल केला आहे.शिष्यवृत्तीचा पहिला पेपर दुपारी १ ते २.३0 वाजता, तर दुसरा पेपर ३.३0 ते ५ या वेळेत घेण्याचे निश्चित करून तशा सूचना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला दिल्या आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी हे पत्र मिळाल्यानंतर तातडीने गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या.
जिल्ह्यातून ३६ हजार ७५३ विद्यार्थी देणार परीक्षाया परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने संपूर्ण तयारी केली असून, विद्यार्थी संख्याही निश्चित झाली आहे. ३६ हजार ७५३ विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यात ५ वीचे २२ हजार ९१७, तर ८ वी साठी १३ हजार ८३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या परीक्षा केंद्रांची यादीही आॅनलाईन पद्धतीने तयार करून ठेवली आहे.