कोल्हापूर - राजारामपुरी पाचवी गल्ली येथील विजेच्या खांबावर अडकलेला पतंग काढत असताना विजेचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. समर्थ अविनाश चौगुले (वय ११) असे त्याचे नाव आहे. बाहेरुन तुटून आलेला पतंग विजेच्या खांबावर अडकला होता. तो काढण्याचा मोह अखेर समर्थच्या जिवावर बेतला. दिवाळी सणाच्या तोंडावर शनिवारी दूपारी चारच्या सुमारास घडलेल्या दूर्घटणेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अधिक माहिती अशी, समर्थ चौगुले हा सहावी मध्ये शिकत होता. वडील मोटारसायकल दुरुस्तीचा व्यवसाय करतात. आई पुजा कपड्याच्या दूकानात नोकरी करते. लहान भाऊ शुभम हा शाळेला असतो. दिवाळी सुट्टीमुळे शनिवारी घरी आजोबा आणि दोघे भावंडे होते. समर्थच्या घरासमोर विजेचा खांब आहे. तेथून ११ हजार व्होल्टची विद्युत वाहिनी गेली आहे. त्यावर बाहेरुन तुटून आलेला पतंग अडकला होता. त्यावर समर्थची नजर पडताच तो पतंग खाली काढण्यासाठी धडपडू लागला. उंचावर असल्याने सहजासहजी काढता येत नव्हता. त्यामुळे समोरच्या भोरे यांच्या दूमजली घराच्या गच्चीवर तो चढला. हात पोहचत नसल्याने लोखंडी पाईपच्या सहाय्याने पतंग काढण्याचा प्रयत्न करीत असताना विद्युत वाहिनीला पाईचा स्पर्श होताच त्याला जोराचा धक्का बसला. पंधरा फुट उंचावरुन तो खाली कोसळून बेशुध्द पडला.गल्लीमध्ये हा प्रकार लक्षात येताच लोकांनी त्याला तत्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. समर्थचे आई-वडील कामावर गेले होते. त्यांना हा प्रकार समजताच त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. पोटच्या मुलाचा मृतदेह पाहून त्यांचा अक्रोश ºहदय पिळवटून टाकणारा होता. राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
राजारामपुरीत विजेचा धक्का बसून शाळकरी मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 7:38 PM