कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे स्कूलबसची चाके थांबल्याने उदरनिर्वाह करण्यासाठी या बसचे मालक, चालकांनी कामाची पर्यायी व्यवस्था शोधली. त्यात गेल्या आठ महिन्यांत काहींनी भाजी, दूध विक्री केली, तर काहींनी शेतामध्ये काम केले. शाळेतील काम बंद झाल्याने त्यांची आर्थिक स्थिती कोलमडली. बसखरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभारला आहे.
लॉकडाऊनमुळे दि. १५ मार्चपासून जिल्ह्यातील शाळा बंद झाल्या. त्यामुळे स्कूल बसचालक, मालकांचा रोजगारही थांबला. चालकांना मार्चमध्ये केलेल्या कामाचा एप्रिलमध्ये पूर्ण पगार मिळाला; पण पुढील दोन ते अडीच महिने त्यांना घरीच बसावे लागले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांतील काहींनी रुग्णवाहिका चालक, तर वॉर्डबॉय म्हणून काम केले. शेतीसह ‘एमआयडीसी’मध्ये मिळेल ते काम केले. काही शाळांनी गेल्या दीड महिन्यापासून थोड्या बसेसची सेवा सुरू केल्याने काही चालक, मालकांचे काम पुन्हा सुरू झाले आहे. आर्थिक स्थिती कोलमडली असल्याने कर्जाच्या व्याजात सवलत आणि बसच्या भरलेल्या विम्याची रक्कम परत मिळावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.
प्रतिक्रिया
गेले आठ-नऊ महिने काम थांबल्याने आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. बँकांकडून हप्ते भरण्यासाठी घाई होत आहे. आम्हांला कर्जाच्या व्याजामध्ये सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावा.
-संतोष पाटील, मालक, स्कूलबस
प्रतिक्रिया
लॉकडाऊनमध्ये घरखर्च भागविण्यासाठी शेतीत काम केले. दुसऱ्या प्रवासी वाहनांवर चालक म्हणून काम केले. बस बंद असली, तरी गेल्या पाच महिन्यांपासून शाळेने माझ्या हाताला दुसऱे काम दिले.
- युवराज दळवी, चालक, स्कूलबस
प्रतिक्रिया
स्कूल बसचा आम्ही वर्षभराचा विमा भरला आहे; पण, गेले आठ महिने बस फिरलेली नाही. त्यामुळे त्याचा आणि आमच्या आर्थिक स्थितीचा विचार करून सरकारने विम्याची संबंधित रक्कम आम्हाला परत द्यावी अथवा पुढील वर्षासाठी ती वर्ग करावी.
- महादेव पाटील, मालक, स्कूल बस
प्रतिक्रिया
लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात एक महिना मी घरी बसून होतो. त्यानंतर माझ्या अन्य काही चालक सहकाऱ्यांच्या शेतातील भाजीची विक्री मी केली. लॉकडाऊनमध्ये शाळेने मार्चचा पूर्ण पगार दिला, धान्याची मदत केली. सध्या काम पुन्हा सुरू झाले आहे.
- गुणधर आडुरे, चालक, स्कूलबस
चौकट
आर्थिक अडचण वाढली
बसमालकांना एका विद्यार्थ्यामागे ४०० ते ६०० रुपये मिळतात. हे पैसेही अनेक पालक दर दोन ते तीन महिन्यांनी एकत्रितपणे देतात. एप्रिलमध्ये पालकांकडून पैसे मिळणार होते; पण, त्यापूर्वीच लॉकडाऊन सुरू झाल्याने हे पैसे थांबले. ८० टक्के मालकांनी बँक अथवा फायन्सास संस्थेकडून कर्ज घेऊन बस खरेदी केल्या आहेत. त्यासाठी दरमहा त्यांना १२ ते १३ हजारांचा हप्ता भरावा लागतो. गेल्या आठ महिन्यांत पैसेच मिळाले नसल्याने त्यांची आर्थिक अडचण वाढली आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
जिल्ह्यातील एकूण स्कूल बसेस - ७५४
यातील खासगी बसेस- २७२
शाळांच्या मालकीच्या बसेस- ४८२
स्कूल बसच्या माध्यमातून रोजगार मिळालेल्यांची संख्या- सुमारे एक हजार