चंदगड : माणगाव (ता. चंदगड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या बंधाऱ्यात म्हैस धुताना बुडून आकाश लक्ष्मण नाईक (वय १२, रा. माणगाव) या सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी, आकाश हा मोठा भाऊ विठ्ठलबरोबर म्हशी चारावयास आरोग्य केंद्राजवळ गेला होता. म्हशीला पाणी पाजवण्यासाठी जवळच असलेल्या बंधाऱ्यात दोघेजण गेले. म्हशीबरोबर असलेल्या रेडकाला धुण्यासाठी आकाश पाण्यात गेला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आकाश पाण्यात बुडू लागला. भाऊ बुडत असल्याचे पाहून आकाशला वाचवण्यासाठी रस्त्याकडे येऊन विठ्ठलने आरडाओरडा केला, मात्र मदतीसाठी कोणीही रस्त्याकडे नव्हते, तसेच आरोग्य केंद्रातही कोणी नव्हते. त्यामुळे आकाशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबतची वर्दी कोवाड पोलिसांना इराप्पा गणपती पिटुक याने दिली. मृत आकाश याच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. आकाशच्या दुर्दैवी मृत्यूने नाईक कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अधिक तपास हवालदार जमीर मकानदार करीत आहेत. (प्रतिनिधी)
शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू
By admin | Published: August 28, 2016 12:31 AM