कोल्हापूर : राज्यातील शिक्षण क्षेत्रात अलीकडे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबद्दल अनेकवेळा प्रयत्न करूनही शासनाने योग्य तो निर्णय घेतलेला नाही. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित समस्या शासनाने सोडवाव्यात म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्यावतीने येत्या बुधवारी (दि. ९ ) व गुरुवारी (१०) राज्यासह जिल्ह्णातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शांळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील, कोल्हापूर जिल्हा संस्थाचालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख उपस्थित होते. लाड म्हणाले, ‘सध्याचे शासन अशैक्षणिक निर्णय घेत आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. याबाबत व्यासपीठांच्यावतीने टप्प्याटप्प्यांने घंटानाद आंदोलन, झोपमोड आंदोलन व मोर्चा अशी आंदोलने केली. मात्र, या समस्या सोडविण्यासाठी शासनाने कोणतीच ठोस पावले उचललेली दिसून येत नाहीत. त्यामुळे पुढील टप्प्यामध्ये आम्ही दोन दिवस शाळा बंद आंदोलन करणार आहे. त्यानंतर १६ डिसेंबरला नागपूर अधिवशेनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. जर आमच्या प्रश्नांची दखल घेतली नाही, तर नाईलाजास्तव आम्हाला बेमुदत शाळा बंद आंदोलन करावे लागेल.’ राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील, महानगर माध्यमिकचे अध्यक्ष राजेश वरक, कोल्हापूर जिल्हा शिक्षक परिषदेचे अध्यक्ष डी. जी. लाड, कोल्हापूर जिल्हा शारीरिक शिक्षक संघाचे आर. डी. पाटील, आदी उपस्थित होते. त्यांनीही आंदोलनास पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)
बुधवार, गुरुवारी शाळा बंद
By admin | Published: December 06, 2015 12:43 AM