अशोक खाडे-कुंभोज--जिल्ह्यात शालेय पोषण आहाराच्या तांदळाचे वाटप ७ सप्टेंबरपासून सुरू झाले असून, आॅगस्ट व सप्टेंबर अशा दोन महिन्यांचा तांदूळ व इतर वस्तूंचा पुरवठा केंद्रनिहाय शाळांना होऊ लागला आहे. परिणामी, गेले महिनाभरापासून बंद झालेले माध्यान्ह भोजन तांदूळ मिळेल त्या शाळांतून पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले आहे. पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयाकडून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरवठा करण्यात येणारा तांदूळ तसेच अन्य वस्तूंचा पुरवठा करण्यास ६ आॅगस्टपासून ठेकेदारांना मनाई करण्यात आल्याने गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यातील शालेय पोषण आहार योजना ठप्प झाली होती. परिणामी, बहुतेक प्राथमिक व माध्यमिक शाळांतील पहिली ते आठवी इयत्तेत शिकणारे विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित होते. ७ सप्टेंबरपासून दि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनने नेमलेल्या जिल्ह्यातील दोन ठेकेदारांकडून तांदूळ तसेच अन्य वस्तूंचा पुरवठा शाळांना सुरू झाल्याने हातकणंगलेसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील काही शाळांत माध्यान्ह भोजन पूर्ववत सुरू झाले आहे. गौरी-गणपती सणाच्या सुट्यांमुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत तांदूळ पोहोचण्यास मात्र २५ सप्टेंबर उजाडणार आहे. गेल्या महिनाभरापासून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत होणारा धान्यपुरवठा बंद झाल्याने बहुतेक शाळांतील माध्यान्ह भोजन बंद झाले, तर काही शाळांनी तांदूळ उसना घेऊन पोषण आहार सुरू ठेवला. दुपारचे भोजन तब्बल महिनाभर बंद राहिल्याने संबंधित शाळांतील मुले घरच्या डब्यावर अवलंबून होती, तर मळेभागातील विद्यार्थ्यांना घरातून जेवणाचे डबे वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यावर या काळात उपाशी राहण्याची वेळ आली होती.ठेक्याची मुदत संपण्यापूर्वीच आम्हास धान्यपुरवठा करू नये, असे आदेश आल्याने ६ आॅगस्टपासून पुरवठा बंद राहिला. पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयाकडून ७ सप्टेंबरला तांदूळ वाटप पूर्ववत सुरू करण्याचे आदेश मिळाल्याने आम्ही त्याच दिवसापासून जिल्ह्यात दोन ठेकेदारांकरवी शाळांना केंद्रनिहाय आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांचे तांदूळ, तेल, डाळी, आदी वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. दरम्यान, शाळांना गौरी-गणपती सणांची दीर्घ सुटी असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांत तांदूळ २५ सप्टेंबरअखेर मिळेल.- वीरेंद्र द्विवेदी, शालेय पोषण आहार धान्यपुरवठा ठेकेदार.
शालेय पोषण आहार होतोय पूर्ववत
By admin | Published: September 11, 2015 9:53 PM