नितीन भगवान
पन्हाळा: गेले दोन दिवस संततधार पावसामुळे पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या गुडे येथील प्राथमिक शाळेचे आतील छत कोसळले. यादुर्घटनेत मुख्याध्यापक सुभाष पाटील गंभीर जखमी झाले. पाटील यांना तातडीने पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान दुपारची जेवणाची वेळ होती यामुळे या ठिकाणी मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला.विद्यामंदिर गुडे येथे पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण दिले जाते. याठिकाणी तेवीस विद्यार्थी शिक्षण घेत असुन दोन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेची इमारत धोकादायक झाल्याने येथील एकाच वर्गात सर्व मुले बसतात. गेली दोन वर्षापासून धोकादायक इमारतीबाबत जिल्हा परिषद व पंचायत समितीला कळवल्याचे शिक्षक व पालकांनी सांगितले. सद्या शाळा दुरुस्तीसाठी फंड आला असून पावसाळ्या नंतर हे काम होईल असे शिक्षिका संगीता गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, शाळा दुरुस्ती पर्यंत गुडे येथील अंगणवाडीच्या इमारतीत शाळा भरली जाईल असे गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शाळेचे लवकर बांधकाम करण्यात येईल असेही ते म्हणाले.