कोल्हापूर : महापुरामुळे आठ दिवसानंतर प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मंगळवारपासून सुरु झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती राहिली. पाऊस आणि पुराच्या पाण्यामुळे शाळांमध्ये चिखल, कोंदट वास पसरला आहे. त्यांच्या स्वच्छतेनंतरच पूर्ण क्षमतेने शाळा भरणार आहेत. त्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत.महापुराची परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षिततेच्या कारणावरुन जिल्हा प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांना आठ दिवस सुटी जाहीर केली. शाळा, महाविद्यालये मंगळवारपासून पूर्ववत सुरु झाली.
महापुराचे पाणी आणि आठ दिवस शाळा बंद राहिल्याने त्याठिकाणी पाणी, चिखल साठण्यासह कोंदट वास पसरला आहे. बेंच, बाकांना बुरशी लागली आहे. त्यांची स्वच्छता करण्याचे काम मंगळवारी दुपारपर्यंत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून सुरु होते. शहर आणि ग्रामीण भागातील पाणी ओसरल्याने दुर्गंध पसरली आहे.महापालिका, ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेचे काम सुरु आहे. आरोग्याच्यादृष्टीने दक्षता म्हणून अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविलेले नाही.