लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील पाटणे येथील प्राथमिक शिक्षकाने अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याची घटना घडूनही त्याबद्दल शाळा समितीने बालकल्याण समितीला कोणतीच माहिती न दिल्याबद्दल तुमच्यावर गुन्हे का दाखल करू नयेत अशी नोटिस समितीने सोमवारी सर्व आठ सदस्यांना बजावली. त्यांना चौकशीसाठीही बोलवण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करून आपण स्वत: पोलिसांत गुन्हा दाखल करावा, असेही आदेश बालकल्याण समितीने शाहूवाडी पोलिसांना दिले होते. परंतु त्यांनीही ही बाब गांभीर्याने न घेतल्याने आजअखेर याप्रकरणी गुन्हाच दाखल झालेला नाही.
या प्रकरणातील मुलगी अल्पवयीन असल्याने संबंधित शिक्षकाविरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. समितीने शाहूवाडी पोलीस निरीक्षकांना आपण स्वत:हून चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु न्यायिक समिती असूनही पोलिसांकडूनही तक्रार द्यायला कोण येत नाही तर आम्ही कुणावर गु्न्हा दाखल करायचा असा पवित्रा घेतला जात आहे.
ही मूळ घटना २० मे च्या दरम्यान घडली आहे. संबंधित शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यातील आहे. ही घटना घडल्यावर ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकास वाटेत अडवून चोप दिला. त्याचे वृत्त लोकमतमध्ये २५ मे रोजी प्रसिध्द झाले. त्यानंतर लगेच जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांनी या शिक्षकाला निलंबित करावे, असे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. बालकल्याण समितीने जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सामाजिक कार्यकर्ता महेंद्र कांबळे यांना गावी पाठवून चौकशी करण्यास सांगितले. त्यांनी ३ जूनला गावी भेट दिली. परंतु स्थानिक पातळीवर माहिती द्यायला कोणच पुढे आले नाही. घटना तर घडली आहे आणि तक्रार कोण देत नाही म्हणून गुन्हाच दाखल नाही अशी स्थिती असल्याने समितीने सोमवारी कडक भूमिका घेत शाळा समितीच्या सदस्यांना नोटिसा बजावल्या.