कोल्हापूर : येथील तेरा वर्षीय कुणाल सदाशिव पाटील (रा. शाहुपुरी रेल्वे लाईन) या शाळकरी मुलाने रविवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कुणालने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कुणाल पाटील हा आठवीमध्ये शिकत होता. त्याचे वडील शासकीय नोकरीत असून, रविवारी त्याच्या घरातील सर्वजण त्यांच्या मूळगावी शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर येेथे गेले होते. त्यावेळी वडील सदाशिव पाटील यांच्या नोकरीच्या ठिकाणी कुणाल वडिलांसोबत खेळत होता. सायंकाळी पाच वाजता तो घरी गेला. त्यानंतर सायंकाळी सात वाजता त्याच्या मित्रांनी कुणालने आत्महत्या केल्याचा फोन वडील सदाशिव यांना केला. त्यामुळे तातडीने सदाशिव पाटील हे घरी गेले असता, त्यांना कुणालने घरात फॅनला दोरीने गळफास लावून घेतल्याचे दिसले. या घटनेमुळे पाटील कुटुंबीय हबकले. गावी गेलेले सर्वजण रात्री घरी परतले आहेत. दरम्यान, कुणालने आत्महत्या का केली? याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. कुणालच्या मृत्यूमुळे त्याच्या वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. कुणाल हा चांगला क्रिकेटपटू होता. क्रिकेट खेळासाठी प्रशिक्षक लावा म्हणून गेले काही दिवस तो वडिलांकडे आग्रह करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
फोटो नं. २७१२२०२०-कोल-कुणाल पाटील (गळफास)