कोल्हापूर : शहरातील खासगी कोचिंग क्लासेसची कोविड १९ चे नियम पाळून सुरू आहेत का याची तपासणी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शंकर यादव व त्यांच्या पथकाने केली. आज, गुरुवारी शहरातील शाळा व महाविद्यालय यांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासगी कोचिंग क्लास, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन केले जाते का नाही याची तपासणी करण्याचे आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहेत.
यादव यांच्या नियंत्रणाखाली शैक्षणिक पर्यवेक्षक यांची तीन भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. ही भरारी पथके शाळा, ज्युनिअर कॉलेज, सिनियर कॉलेज व खासगी कोचिंग क्लासेस यांना अचानक व प्रत्यक्ष भेटी देऊन तपासणी करणार आहे.
विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोचिंग क्लास, शाळा व कॉलेजमध्ये मास्क वापरण्यास सांगावे. सॅनिटायझर उपलब्ध करून ठेवावे. वर्गात विद्यार्थ्यांना बसविताना सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात यावे. शाळेतील स्वच्छतागृह नेहमी स्वच्छ ठेवावीत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. स्टाफरूम व क्लास, शाळा, कॉलेज परिसरात शिक्षक व विद्यार्थी गर्दी करणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासन अधिकारी यादव यांनी केले आहे.