लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभोज : कोल्हापूर जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा अंतिम करण्यापूर्वी तयार झालेली ६१९ शाळांची यादी प्रसिद्ध करावी. निकष पूर्तता करणाऱ्या ज्या शाळांचा समावेश या यादीत झालेला नाही त्यांना हरकत नोंदविण्यास संधी देऊन पात्र शाळांचा यादीत समावेश करावा, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने केली आहे.
शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणामध्ये ७/४/२०२१च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी घोषित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित केली असून, या समितीने शासन निर्णयामध्ये दिलेल्या ७पैकी किमान ३ निकषांची पूर्तता करणाऱ्या शाळांना अवघड क्षेत्रातील शाळा म्हणून घोषित करावयाचे आहे. ही यादी तयार करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत योग्य त्या पुराव्यासह अवघड क्षेत्रातील ६१९ शाळांची यादी तयार केली आहे. ही तालुकानिहाय अवघड शाळांची यादी अंतिम मान्यतेसाठी गठित समितीपुढे ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांच्या यादीमध्ये कोणतीही त्रुटी राहू नयेत, यासाठी सदर यादी अंतिम करण्यापूर्वी तयार झालेली यादी प्रसिद्ध करून त्यावरती हरकती नोंदविण्यास मुदत द्यावी तसेच ७पैकी किमान ३ निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची नावे या यादीमध्ये आली नसतील तर अशा निकष पूर्ण करणाऱ्या संबंधित शाळांकडून योग्य पुराव्यासह हरकत नोंदवून घेऊन पुराव्यांच्या पडताळणीअंती पात्र असलेल्या शाळा अवघड क्षेत्रातील शाळा म्हणून घोषित कराव्यात, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
या निवेदनावर संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा नेते गोविंद पाटील, जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, जिल्हा सरचिटणीस शंकर पवार, विद्या कदम, शारदा वाडकर, सुनील पोवार, अशोक शिवणे, भारती चोपडे, प्रेरणा चौगुले, दिगंबर टापुगडे, राजश्री पिंगळे, मनिषा गुरव, आदींच्या सह्या आहेत.
तालुकानिहाय दुर्गम तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची संख्या.