लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना संबंधितांना लवकरच देण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, कोल्हापूर महिला मंचच्या वतीने सोमवारी चव्हाण यांना याबाबत निवेदन देण्यात आले. ज्या शाळांमध्ये अजूनही अलगीकरण कक्ष आहेत / स्वॅब टेस्ट सेंटर आहेत त्या शाळांमधील शिक्षकांना शाळा कार्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती न करता त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा असावी. आरोग्याच्या दृष्टीने महिला शिक्षिकांचीही खूप मोठी अडचण होत आहे, ती दूर करावी. शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणासाठी पुरेसा वेळ देता यावा यासाठी कोरोना सर्वेक्षण कामातून शिक्षकांना मुक्त करावे. गेली सहा महिने शासनाकडून बी. डी. एस प्रणाली बंद असल्याने अनेक फंडप्रकरणे प्रलंबित आहेत, सदर प्रकरणे ऑफलाईन पद्धतीने देण्यात यावीत, विद्यार्थी पटनोंदणीसंदर्भात वयाची अट ३० सप्टेंबरच असावी, आदी मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळात संघटनेच्या महिला राज्य उपाध्यक्षा प्रमिला माने, महिला जिल्हा सरचिटणीस शारदा वाडकर, महिला प्रसिद्धी प्रमुख मनीषा गुरव, करवीर अध्यक्षा वृषाली पाटील, संघटक माधवी पाटील, पन्हाळा सरचिटणीस मंगल देवेकर उपस्थित होते.
फोटो ओळी : जिल्ह्यातील प्राथमिक शाळा नर्जंजतुकीकरण करा, यासह विविध मागण्यांचे निवेदन पुरोगामी शिक्षक संघटना, महिला मंचच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना देण्यात आले. (फोटो-२१०६२०२१-कोल-झेडपी)