कोल्हापूर : दिवाळी सुटीनंतर मंगळवारी शहरातील प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा सुरू झाल्या. त्यामुळे शहरातील अनेक घरांमध्ये सकाळपासूनच मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होती. दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ शाळांच्या समोर रिक्षामामांचीही गर्दी दिसत होती. यामुळे शाळा परिसर पुन्हा एकदा फुलला होता. यावर्षी काही शाळांना २४, २७ आणि २८ आॅक्टोबरला सुटी पडली होती. किल्ला, फटाके, नवीन कपडे आणि फराळ यामुळे मुलांनी दिवाळीची सुटी ‘फुल्ल टू धमाल’ केली होती. आता दिवाळीची सुटी संपल्यामुळे आणि शाळेचा पहिला दिवस असल्याने काहीजणांनी हसत, रुसत शाळेत प्रवेश केला; तर काहींनी बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या आपल्या मित्रांबरोबर दंगामस्ती केली. मंगळवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांना तयार करून स्वत: पालक सोडायला शाळेत आले होते. काही विद्यार्थी रिक्षातूनही आले हाते. त्यामुळे शाळांचा परिसर गजबजला होता. (प्रतिनिधी)
शाळा आज पुन्हा फुलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 12:34 AM