इयत्ता नववीमध्ये मिळालेल्या गुणांचे ५० टक्के गुण, वर्षभरात दहावीच्या विविध लेखी परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांचे ३० गुणांकनाने लेखी आणि २० गुणांकांनी तोंडी परीक्षेच्या गुणांची बेरीज अशी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची पद्धत शालेय शिक्षण विभागाने ठरविली आहे. त्यानुसार इयत्ता नववीचे गुण शाळांकडून स्टुडंटस पोर्टलवर भरले आहेत. जिल्ह्यातील ६५ ते ७० टक्के शाळांनी दहावीच्या तोंडी, अंतर्गत परीक्षा घेतल्या आहेत. कोरोनामुळे काही शाळांना या परीक्षा घेता आलेल्या नाहीत. या शाळांकडून शासनाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान, दहावीच्या मूल्यमापनाबाबत राज्य शासनाच्या आदेशाची माहिती शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाद्वारे शाळांना दिली आहे. मूल्यमापनाचा आराखडा राज्य मंडळाकडून प्राप्त झाल्यानंतर कोल्हापूर विभागातील शाळांना दिला जाणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव देविदास कुलाल यांनी दिली.
चौकट
अंतर्गत परीक्षा ऑनलाइन
कोरोनामुळे ज्या शाळांना त्यांच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी, अंतर्गत परीक्षा घेता आलेल्या नाहीत. अशा शाळांनी या परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेण्याची सूचना मंगळवारी शिक्षण विभागाने केली असल्याची माहिती वाकरे येथील शिक्षक बी. बी. पाटील यांनी दिली.