आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २६ :कोल्हापूर जिल्ह्यातील सातशे शाळांना प्रत्येकी पाच फुटबॉल जुलैच्या पहिल्या आठवडयात वाटप केले जाणार आहेत. फिफा युवा विश्व चषक स्पर्धा प्रथमच भारतात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा संचलनालयातर्फे संपुर्ण राज्यात फुटबॉलचा प्रसार करण्यासाठी योजना आणली आहे. यात जिल्ह्यात एकूण ३५०० फुटबॉल वाटले जाणार आहेत.
याबाबत कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे नियोजन केले जात आहे. ज्या शहरात फुटबॉल खेळाला प्राधान्य दिले जाते अशा शहरातील शाळांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी ५ फुटबॉलचे वाटप केले जाणार आहेत. जिल्ह्यातील सातशे शाळांना प्रत्येकी ५ प्रमाणे ३५०० फुटबॉल वाटप केले जाणार आहेत. विशेष म्हणजे एकाच दिवशी राज्यातील वीस हजार शाळांना फुटबॉल वाटप केले जाणार आहेत. त्यातून किमान दहा लाख खेळाडू एकाचवेळी मैदानावर उतरविले जाणार आहेत.
सतरा वर्षाखालील फिफा युवा चषक भारतात होत आहे. यातील सामने मुंबई, कोलकत्ता, गोवा, गुवाहाटी येथील मैदानावर होणार आहेत. त्यानूसार महाराष्ट्रातील फुटबॉल खेळाला आंतरराष्ट्रीयस्तरावर नेण्यासाठी अशाप्रकारचे नियोजन शालेय व क्रीडा संचलानालयातर्फे केले जात आहे.
जिल्ह्यातील सातशे शाळांना जुलैमध्ये प्रत्येकी ५ फुटबॉल राज्य शासनातर्फे भेट दिले जाणार आहेत. यातून फुटबॉलचा प्रसार व प्रचार केला जाणार आहे. याशिवाय फुटबॉलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहरांमध्ये आमदार चषक सारख्या स्पर्धाही घेतला जाणार आहेत.
- माणिक वाघमारे ,
जिल्हा क्रीडाअधिकारी
कोल्हापूरसारख्या शहरात संस्थानकालापासून फुटबॉलचे बीजे रोवली गेली आहेत. त्यात राज्य शासनाच्या शालेय व क्रीडा खात्यातर्फे युवा विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर असे प्रोत्साहन म्हणजे दुग्धशर्करा योग आहे.
- प्रदीप साळोखे,
फुटबॉल प्रशिक्षक, कोल्हापूर