कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय मंडळाने आज, मंगळवारी सकाळी प्रशासक रंजन लाखे यांच्याकडे रितसर ताबा दिला. अशासकीय मंडळाने न्यायप्रविष्ठ बाब असताना सामंजस्याची भूमिका घेत अध्यक्ष आर. के. पोवार यांनी रंजन लाखे यांच्याकडे पदभार दिल्याने शासकीय की अशासकीय मंडळ या वादावर अखेर पडदा पडला. गेले आठ दिवस समितीत प्रशासक की अशासकीय मंडळ हा वाद सुरू होता. सोमवारी तर करवीरच्या तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्तात रंजन लाखे यांना कागदोपत्री पदभार दिला होता; पण कामकाज करण्यास अशासकीय मंडळाने मज्जाव केला होता. सोमवारी सायंकाळनंतर बाजार समिती पातळीवर कमालीच्या घडामोडींना वेग आला. जिल्हा उपनिबंधकांनी दिलेले आदेश व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून प्रशासक लाखे यांना पदभार देणे उचित होईल, यासाठी काही सदस्यांनी अध्यक्ष पोवार यांच्याकडे रेटा लावला होता. पण काही ‘कारभारी सदस्य’ त्यासाठी तयार नव्हते. अखेर उच्च न्यायालयातील याचिकेसह सर्वच कायदेशीर बाबींचा अभ्यास करून आज पदभार देण्याचा निर्णय अध्यक्ष पोवार यांनी घेतला. त्यानुसार दुपारी बारा वाजता रंजन लाखे यांचे स्वागत करून त्यांना रितसर पदभार दिला. यावेळी मधुकर जांभळे, वैभव सावर्डेकर, उपसचिव विजय नायकल, सहायक सचिव मोहन सालपे, कोळेकर, आदी उपस्थित होते. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणार : रंजन लाखेराज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा उपनिबंधकांनी कोल्हापूर बाजार समितीमधील अशासकीय मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त केले. गेली तीन दिवस बँक खात्यांसह इतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून पदभार स्वीकारला आहे. आज रितसर कामकाजास सुरुवात करणार असून, आगामी काळात समितीचे उत्पन्नवाढीकडे विशेष लक्ष देणार असल्याची माहिती प्रशासक रंजन लाखे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जागतिक बँकांच्या निधीतून समितीमधील पायाभूत सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी, अडते व व्यापाऱ्यांच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी आपण बांधील राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया लवकर सुरू करण्यासाठी आपली नियुक्ती झाली असून जिल्हा निवडणूक शाखा व समिती प्रशासनाकडून माहिती घेऊन निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) ‘थर्ड पार्टी’ याचिका फेटाळली!बाजार समितीच्या संचालकांची मुदत संपल्याने त्वरित निवडणुका घ्याव्यात. तोपर्यंत अशासकीय मंडळ कार्यरत ठेवावे, अशी याचिका कोल्हापुरातील काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यावर सुनावणी होऊन निवडणुका घेण्याचा निर्णय हा सरकारचा विषय असल्याचे सांगत याचिका फेटाळून लावल्याचे समजते. रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत लवकरच निर्णयकोणत्याही राजकीय दबावापोटी आम्ही ही कारवाई केलेली नाही. राज्य शासनाच्या आदेशानुसार कायदेशीर मार्गाने आम्ही पुढे जात आहे. रोजंदारी ३७ कर्मचाऱ्यांबाबत कायदेशीर बाबींचा अभ्यास करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही रंजन लाखे यांनी सांगितले. तीन महिन्यांत शेतकरी, व्यापाऱ्यांच्या हितासाठी काम केले. न्यायप्रविष्ठ बाब असल्याने आम्ही पदभार देण्यास विरोध केला. आज पदभार प्रशासकांकडे दिला. न्यायालयीन लढाई सुरूच राहील. - आर. के. पोवार (माजी अध्यक्ष, अशासकीय मंडळ) नेत्यांनी दिलेल्या संधीचे सोने करत शाहू महाराज यांनी वसवलेल्या बाजार समितीचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रत्येक दिवस खर्ची घातला. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले. वर्ष-दीड वर्षे आणखी संधी मिळाली असती तर समितीचा कायापालट केला असता. - प्रा. निवास पाटील (माजी उपाध्यक्ष)कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी अशासकीय मंडळाने प्रशासकांकडे पदभार सुपूर्द केला. यावेळी प्रशासक रंजन लाखे यांचे स्वागत करताना आर. के. पोवार. शेजारी वैभव सावर्डेकर, मधुकर जांभळे, विजय नायकल, आदी उपस्थित होते. तीन महिन्यांत अशासकीय मंडळाने हे केले - गूळ नियमनाचा तिढा असताना सुरळीत गूळ सौदेसमिती आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णयलक्ष्मीपुरी धान्य बाजार स्थलांतराचा निर्णयप्रवेश फी दरात वाढ करून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नकागल उपबाजार आवारात जनावरांचा बाजार सुरू करणेसमितीमधील रस्त्यांच्या साईडपट्ट्यांची साफसफाईचिवे-बांबू बाजार व जनावरांच्या बाजारात मुरूमाने सपाटीकरणसमितीची प्रवेशद्वार बदलणे
शासकीय की अशासकीय वादावर पडदा
By admin | Published: November 18, 2014 11:53 PM