कोल्हापूर : कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा अवघ्या २० मिनिटांत गुंडाळली. विरोधकांच्या पहिल्या लेखी प्रश्नाचे वाचन करत असताना कारखान्याचे संचालक महादेवराव महाडिक यांनी विश्वास नेजदार यांच्यावर हल्ला चढविल्याने गोंधळ सुरू झाला. गोंधळातच अहवाल हातात धरत महाडिक यांनी अहवाल ‘मंजूर’ करण्याचे आवाहन केल्याने गोंधळ वाढत गेला. सत्तारूढ व विरोधक आमने-सामने येत घोषणाबाजी करत एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. विरोधी गटाने सभास्थळाच्या बाहेर समांतर सभा घेत कारभाराचे वाभाडे काढले. राजाराम कारखान्याची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी कारखाना कार्यस्थळावर झाली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने होते. प्रास्ताविकात केंद्र व राज्य सरकारच्या साखर धोरणावर थेट टीका करत महादेवराव महाडिक म्हणाले, साखरेला जीवनाश्यक वस्तूंतून वगळणे गरजेचे असून, आयात-निर्यातीबाबत दीर्घ मुदतीचे धोरण अवलंबले तरच व्यापारी गुंतवणुकीसाठी पुढे येतील. ‘राजाराम’ची जुनी मशिनरी असताना कर्मचाऱ्यांनी प्रतिदिनी ३७०० टन गाळप केले, तोडणी-वाहतूक वजाजाता २४०८ रुपये एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. सहवीज प्रकल्प ८० कोटी ४६ लाख व मशिनरी विस्तारीकरणाचा विचार सुरू आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत आपला प्रकल्प कमी खर्चात होईल. ऊस वाढावा, यासाठी पोटनियम दुरुस्तीसाठी ठेवला असून, त्यास मान्यता द्यावी, असे आवाहन महाडिक यांनी केले. पारदर्शक कारभार करून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या दरापेक्षा २० टक्के कमी दराने खरेदी केली जाते. मागील दोन वर्षांतील साखरेच्या दरामुळे तोटा दिसत आहे. चांगल्या सूचना करा, स्वीकारून अधिक चांगले काम करण्याची ग्वाही महाडिक यांनी दिली. प्रास्ताविकानंतर तानाजी चव्हाण (कसबा बावडा) यांनी तोडणी कामगार व कंत्राटदार यांच्याकडून येणे असलेल्या तीन कोटी २९ लाखांपैकी ‘कारभारी संचालका’कडे किती रक्कम आहे असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचा संदर्भ देत, चव्हाण यांनी हा प्रश्न साडेदहा वर्षे उपाध्यक्ष असणाऱ्या नेजदार यांना विचारला असता तर अधिक चांगले झाले असते, असा टोला महाडिक यांनी हाणला. त्यानंतर विरोधकांनी रोखण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत महाडिक यांनी अहवाल हातात धरत ‘मंजूर मंजूर’ असे विचारले. गोंधळातच अहवाल मंजूर होऊन वंदे मातरम् संपले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाल्याने गोंधळ वाढत गेला. ‘भ्याली रे भ्याली’, ‘बंटी-बंटी’ अशा विरोधकांनी, तर ‘महाडिकसाहेबांचा विजय असो’, अशा सत्तारूढांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्याने वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले. अंगावर धावून जाण्यास सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत विरोधकांना सभागृहाबोहर काढले. सभागृहाबाहेर जाऊन विरोधकांनी समांतर सभा सुरू केली, पण तिथेही घोषणाबाजी सुरू झाल्याने गोंधळ उडाला. ‘गोकुळ’चीच पुनरावृत्ती!‘गोकुळ’च्या सभेत अध्यक्षांनी प्रश्नांवर चर्चा न करता अहवाल मंजूर करण्याचे आवाहन केल्याने गोंधळ उडाला. याही सभेत महाडिक यांनी त्यांचाच कित्ता गिरविल्याने गोंधळ झाला. सभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महाडिक यांनी विरोधकांचे सर्वच प्रश्न खोडून काढण्याचा प्रयत्न केला; पण संयम राखत हेच काम सभेत केले असते तर महाडिक यांनी सभा जिंकली असती, अशी चर्चा सभास्थळी सुरू होती. ‘तराटणी’नेच सभेची सुरुवात!‘विरोधकांच्या प्रश्नांना स्वत: उत्तर देणार आहे, ही संतांची सभा नव्हे. कोणी जास्त शहाणपण शिकवू नये. आम्ही चुकणार नाही, कोण जाणीवपूर्वक चुकत असेल तर त्याचा हिशेब चुकता केला जाईल,’ अशा शब्दांत महाडिक यांनी तराटणी देऊन सभेला सुरुवात केली. मराठा मोर्चात सहभागी व्हामराठा समाजावर आजपर्यंत शोषून व अन्याय झाला असून, मूक मोर्चाच्या माध्यमातून न्याय मागत आहोत. भीक मागत नाही, लढून मिळविण्याची धमक आहे. आतापर्यंत संयमाने मागणी केली आहे, सरकारने त्याची दखल घेऊन आरक्षण द्यावे. कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटीमधील जाचक कलमे रद्द करावीत, अशी मागणी करत १५ आॅक्टोबरच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन महाडिक यांनी केले. प्रश्न फक्त बावड्यातीलच कसे?कारखान्याचे १८० गावांचे कार्यक्षेत्र आहे, पण सभेला आलेले लेखी प्रश्न कसबा बावड्यातीलच कसे? असा खोचक प्रश्न करत एवढा विश्वास सभासदांचा माझ्यावर असल्याचे महाडिक यांनी सांगताच समर्थकांनी घोषणाबाजी केली. कुळ-सहहिस्सेदारही होणार सभासदमालक, संरक्षित मालक अथवा साधे कुळ, सहहिस्सेदार तसेच जमीन मालकाशी रितसर स्टॅम्पवर करार करून नोटरी अगर रजिस्टर केला असल्यास व तो त्या जमिनीचा कब्जेदार असल्यास अशांना सात-बारा वर नोंद नसताना सभासद करून घेण्याच्या पोटनियम दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)‘राजाराम’ला बुडवून महाडिकांचा पंढरपूरला जाण्याचा डावविश्वास नेजदार यांचा आरोप : कारखान्याचा कारभार स्वच्छ, तर सभा का गुंडाळली?कोल्हापूर : कारखान्याचा कारभार स्वच्छ असल्याच्या गप्पा मारता तर अवघ्या पंधरा-वीस मिनिटांत सभा का गुंडाळली? असा सवाल करत कारखान्याच्या भूमिपुत्रांना सभासद न करता दत्तकपुत्रांना करणार असाल तर याद राखा, असा इशारा देत अगोदरच कर्जामुळे डबघाईला आलेल्या ‘राजाराम’वर आणखी कर्ज काढून तो डबघाईला आणण्याचा महाडिकांचा डाव असल्याचा आरोप कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांनी समांतर सभेत केला. सभासदांना काय उत्तरे द्यायची, यासाठी सभा गुंडाळण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. कारखान्यावर १४८ कोटींची कर्जे आहेत. सहवीज प्रकल्पाच्या माध्यमातून आणखी शंभर कोटींचे कर्ज काढून महादेवराव महाडिक कोणाचे हित जोपासत आहेत. महाडिक यांच्या हुकूमशाहीने कारखाना अगोदरच डबघाईला आलेला आहे. तो पूर्ण बुडवून पंढरपूरला जाण्याचा डाव आहे. दहा-पंधरा वर्षे कारखान्याला ऊस घालणाऱ्यांना सभासदांपासून वंचित ठेवण्याचे काम महाडिक यांचे सुरू असून, भूमिपुत्रांना डावलून दत्तकपुत्रांना सभासद कराल तर याद राखा, असा इशारा नेजदार यांनी दिला. यावेळी अनंत पाटील, महादेव पाटील, दत्तात्रय उलपे, तानाजी चव्हाण, अॅड. अजित पाटील, बाबासाहेब देशमुख, शिवाजी किबिले आदी उपस्थित होते.
‘गोकुळ’चा कित्ता ‘राजाराम’मध्ये
By admin | Published: September 30, 2016 12:27 AM