कोल्हापूर : डीवायपी मॉलसंदर्भात झालेले आरोप, तसेच चुकीच्या कर आकारणीबाबत आमच्याकडे काही पुरावे सादर झाले आहेत. त्याची छाननी केली जात असून, जर खरेच चुकीची आकारणी झाली असेल, तर ती निश्चित दुरुस्त केली जाईल. अंतिम आकारणी करून बुडालेला घरफाळा वसूल केला जाईल, अशी ग्वाही सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी बुधवारी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
कृती समितीचे शिष्टमंडळ अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व सहायक आयुक्त विनायक औंधकर यांना भेटले. जर कोणी पुरावे देऊनही तुम्ही कारवाई करीत नसाल, तर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे असा समज जनमानसात जाईल. तेव्हा तुम्ही नेमकी कोणती भूमिका घेतली आहे ते जाहीर करा, अशी मागणी अशोक पोवार व रमेश मोरे यांनी केली.
औंधकर म्हणाले, आम्हाला २७ प्रकरणांची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यातील २० प्रकरणांची आता छाननी सुरू आहे. रजिस्ट्रार ऑफिसकडून काही माहिती मागितली आहे. गेले दोन दिवस आमचे कर्मचारी त्यांच्या कार्यालयात बसून आहेत. माहिती मिळाली की चौकशीला अधिक गती मिळेल. सर्व प्रकरणांची छाननी करून कर आकारणी योग्य पद्धतीने झाली आहे की नाही, हे पडताळून पाहिले जाईल. जर चुकीचा घरफाळा आकारला गेला असेल तर मात्र योग्य तो घरफाळा लावण्याची अंतिम आकारणी केली जाईल.
अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कारवाई
महापालिकेचे काही नुकसान झाले आहे असे निदर्शनास आल्यास ते संबंधितांकडून वसूल केले जाईल, तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाईल, असे औधकर यांनी स्पष्ट केले.
थर्ड पार्टी ऑडिट करणार : देसाई
महापालिकेच्या घरफाळ्याचे लोकल फंडमार्फत थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार आहे. लोकल फंड यांना कायदेशीर अधिकार आहेत. त्यामुळे त्यांच्या ऑडिटला कोणी आव्हान देऊ शकत नाही. या ऑडिटमधून पालिकेचे झालेले नुकसान, जबाबदारी कोणाची होती या सगळ्या गाेष्टी स्पष्ट होतील, असे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी सांगितले.
शिष्टमंडळात राजू मालेकर, कादर मलबारी, शंकरराव शेळके, सी. एम. गायकवाड, श्रीकांत भोसले, लहू शिंदे, मोहन पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, विलास भोंगाळे यांचा समावेश होता.